हुंडा आणि जातीभेदाचा छळ; नवविवाहितेची आत्महत्या, पाच सासरच्यांवर गुन्हा

0
231

माणदेश एक्सप्रेस न्यूज | इस्लामपूर :

इस्लामपूर शहरातील अंबाबाई मंदिर परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. केवळ २५ वर्षीय नवविवाहितेने सासरकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून विष प्राशन करून आपले आयुष्य संपवले. सासूच्या उपचारासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावण्यात येत असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर मृत महिलेच्या सासरच्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मृत विवाहितेचे नाव अमृता ऋषीकेश गुरव (वय २५) असे असून, इस्लामपूर येथील अंबाबाई मंदिर परिसरात ती राहत होती. सुमारे अकरा महिन्यांपूर्वी तिचा इस्लामपूरच्याच ऋषीकेश अनिल गुरव याच्याशी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांतच अमृताचे संसाराचे स्वप्न चुरचुरले.


या प्रकरणी मृत अमृताची आई वंदना अनिल कोले (रा. रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार पती ऋषीकेश अनिल गुरव, सासू अनुपमा अनिल गुरव, सासरे अनिल मधुकर गुरव, नणंद ऋतुजा अनिल गुरव (सर्व रा. इस्लामपूर) आणि पतीचा मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव (रा. वडणगे, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादीत म्हटले आहे की, विवाहानंतर काही महिन्यांनीच अमृताला सासरच्या लोकांनी सासूच्या उपचारासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. अमृताने यास नकार दिल्यानंतर तिच्यावर सतत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. तिला वारंवार शिवीगाळ, अपमान आणि धमक्या देण्यात येत होत्या. “तू आमच्या जातीची नाहीस, आमच्या घरातून निघून जा,” असे शब्द वारंवार ऐकावे लागत होते.


या सततच्या छळामुळे अमृताचे आयुष्य नरकासमान झाले. अखेर या अत्याचाराला कंटाळून तिने ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी विषारी औषध प्राशन केले. प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. परंतु, रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.


या घटनेनंतर इस्लामपूर शहर पोलिस ठाण्यात वरील पाच सासरच्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडाबळी, तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे.


केवळ काही महिन्यांचा संसार, पण सासरकडून मिळालेल्या अपमान आणि छळामुळे एका तरुणीने जीवन संपवले – ही घटना समाजाच्या विवेकाला हादरवणारी आहे. आजही हुंडा आणि जातीभेद यांसारख्या सामाजिक व्याधा महिलांच्या जीवनावर गदा आणत आहेत, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.


या घटनेनंतर इस्लामपूर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. “लग्न म्हणजे दोन कुटुंबांचा मिलाफ असतो, पण पैशासाठी आणि जातीसाठी एका मुलीचे आयुष्य संपवणे ही समाजाला काळिमा फासणारी बाब आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here