लेकीच्या प्रेमसंबंधाला वैतागून बापाने घेतला थरकाप उडवणारा निर्णय

0
503

माणदेश एक्सप्रेस न्यूज | नांदेड :
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात सोमवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसर हादरला आहे. सासरी आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्या गेलेल्या विवाहित तरुणी व तिच्या प्रियकराचा स्वतःच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी जीव घेऊन टाकला. या घटनेत तरुणीचा मृतदेह विहिरीतून तर प्रियकराचा मृतदेह विहीरीजवळ आढळून आला. विशेष म्हणजे, मृत तरुणी दोन महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे एका निरपराध बाळाचाही दुर्दैवी अंत झाला असून समाजमन सुन्न झाले आहे.


घटनेचा थरारक मागोवा

गोळेगाव येथील संजीवनी मारुती सुरणे हिचा विवाह सुदेश कमळे या युवकासोबत एक वर्षापूर्वी झाला होता. लग्नानंतरही तिचे गावातीलच लखन बालाजी भेंडारे या युवकासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचे समजले. यामुळे संजीवनीचे वडील मारुती सुरणे यांनी वारंवार लखनला समजावून सांगितले होते. तरीदेखील हे संबंध सुरूच राहिले.

सोमवारी लखन भेंडारे हा संजीवनीला भेटण्यासाठी गोळेगाव येथे तिच्या सासरी पोहोचला. दोघे एका घरामध्ये आक्षेपार्ह अवस्थेत असताना सासरच्या मंडळींनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर दोघांना बांधून ठेवण्यात आले आणि तात्काळ हा प्रकार माहेरी कळविण्यात आला.


वडिलांचा संताप आणि दुर्दैवी शेवट

ही माहिती मिळताच वडील मारुती सुरणे, आजोबा व काका गोळेगावला आले. सासरच्या मंडळींनी “आपली मुलगी घेऊन जा” असे सांगत दोघांची जबाबदारी माहेरी सोपवली. त्यानंतर वडील व नातेवाईक संजीवनी व लखनला घेऊन गावाकडे पायी निघाले.

मात्र वाटेत झालेल्या अपमानामुळे व संतापाच्या भरात त्यांनी अमानुष कृत्य केले. करकाळा शिवारातील विहिरीत संजीवनीचे हातपाय बांधून तिला फेकण्यात आले. तर लखनला बेदम मारहाण करून त्याचा मृतदेह विहीरीजवळ टाकण्यात आला. हात बांधलेले असल्याने संजीवनीला विहिरीतून बाहेर पडता आले नाही.


मृतदेहांचा शोध

रात्री उशिरा स्थानिकांनी शोध घेतला असता संजीवनीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. तर प्रियकर लखनचा मृतदेह विहीरीजवळ आढळून आला. मंगळवारी सकाळी उमरी ग्रामीण रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले.


पोलिसांची तातडीची कारवाई

या घटनेनंतर मुलीचे वडील मारुती सुरणे, आजोबा व काका यांना पोलिसांनी अटक केली. तर सासरच्या मंडळींनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील, उमरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने घटनास्थळी दाखल झाले.


गावात हळहळ, समाजाला प्रश्न

संजीवनी ही दोन महिन्यांची गर्भवती असल्याने तिच्यासह पोटातील बाळाचाही अंत झाला. एका बापाने स्वतःच्या मुलीचा व तिच्या प्रियकराचा असा थरकाप उडवणारा अंत केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेने गावात संताप, हळहळ व सामाजिक चर्चांना उधाण आले आहे. प्रेमसंबंधामुळे जन्मलेल्या या कौटुंबिक वादाचा असा जीवघेणा शेवट होईल, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here