
माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/प्रतिनिधी : खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी वार्षिक यात्रेला जोरदार सुरुवात झाली असून, आज (25 एप्रिल) हा यात्रेचा मुख्य दिवस आहे.या निमित्ताने गावात धार्मिक उत्साह आणि भक्तांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
यात्रेनिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी, अभिषेक, पालखी मिरवणूक यांचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनासाठी परिसरातील तसेच इतर जिल्ह्यांतील हजारो भाविक खरसुंडीमध्ये दाखल झाले आहेत.
गावात यात्रेनिमित्त भरलेला बाजार, पारंपरिक खेळ, विविध सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे संपूर्ण वातावरण उत्सवमय झाले आहे. आज पहाटेपासूनच श्री सिद्धनाथांच्या दर्शनासाठी रांगा लागण्याची शक्यता असून, मंदिर समिती व प्रशासनाने व्यवस्था चोख केली आहे.
दरवर्षी महाराष्ट्रासह सीमाभागातील कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणातील मोठ्या संख्येने भाविक श्री. सिद्धनाथाच्या सासन काठी सोहळ्याला व दर्शनासाठी येत असतात. आज यात्रेचा मुख्य दिवस असून श्रीनाथ आणि जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्यानंतर सासनकाठी व पालखी सोहळ्यानंतर होणारा उत्सव म्हणजे मुख्य दिवस असून यादिवशी सासनकाठी व पालखी सोहळा होत असतो.
सकाळी पूजा अर्चा झाल्यानंतर धुपारती घेवून, पुजारी बांधव व छत्र चामर घेतलेले सेवेकरी व हजारो भक्त गणासह धूपारती जोगेश्वरी वेताळबा मंदिराकडे जावून येते. दुपारी १ वाजता नाथांचे प्रमुख मानकरी भक्त नयाबा गायकवाड यांचे वंशजणांना पुजारी मंदिरात घेवून येतात. गायकवाड व पुजारी हे धुपारती सह आटपाडीचे मानकरी देशमुख यांना मंदिरात घेवून येतात. त्यनंतर पालखी सोहळ्यास सुरुवात होते.
प्रमुख मानकरी व भक्तगण यांच्या सासन काठ्या मुख्य पेठेतून जोगेश्वरी मंदिराकडे नेल्या जातात. यावर मोठ्या प्रमाणात भाविकांच्या कडून गुलाल, खोबऱ्याची उधळण केली जाते. दुपारी २.३० वाजता पालखीचे जोगेश्वरी मंदिराकडे प्रस्थान होते. नाथबाबाच्या जयघोषात पालखी जोगेश्वरी मंदिरात पोहचते. याठिकाणी सासण काठी व पालखींना जोगेश्वरी मंदिरात मानवंदना दिली जाते. मानपान झाल्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरु होते.
यात्रेसाठी खरसुंडीकडे मोठ्या प्रमाणात भक्तांचा ओघ सुरु आहे. तसेच सासनकाठीवर मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करण्यासाठी गुलाल, खोबऱ्याची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली गेली आहे. भक्तांच्या सोई-सुविधासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात येणारे रस्ते चारही बाजूंनी बंद करण्यात आले असून, चारचाकी व दुचाकी पार्किंग व्यवस्था चारही बाजूला करण्यात आली आहे.