सांगली जिल्हा बँकेच्या “त्या” स्वीकृत संचालकांचा राजीनामा

0
159

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून संचालक झालेले स्वीकृत संचालक सरदार पाटील यांनी त्यांच्या संचालक पदाचा राजीनामा बँकेकडे सादर केला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांचा जाहीर प्रचार केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई म्हणून राजीनामा घेण्यात यावा, असा दबाव वाढत होता. त्यामुळे पाटील यांनी गुरुवारी स्वतः राजीनाम्याचे पत्र बँकेत सादर केले.

बँकेच्या अध्यक्षांच्या नावे लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी वैयक्तिक कारणास्तव, राजीखुशिने व स्वइच्छेने तज्ज्ञ संचालक पदाचा राजीनामा देत आहे. तरी माझा राजीनामा मंजूर करावा. जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली. स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेसमधून जिल्हा बँकेतून सरदार पाटील यांना, तर राष्ट्रवादीतून मनोज शिंदे यांची निवड करण्यात आली होती.

सरदार पाटील हे भाजपमध्ये असताना जत तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य झाले होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना जिल्हा बँकेवर स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळाली. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांचा प्रचार जाहीरपणे त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. सरदार पाटील यांनी विरोधात काम केले असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करीत संचालक पद काढून घ्यावे, अशी मागणी वाढत होती. त्याबाबत आमदार विक्रम सावंत यांच्यावर दबाव वाढत होता.