
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्या संयुक्त विजयी मेळाव्याआधी भाजप नेते नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे. “कोट घालता, टाय लावता म्हणून लोक ऐकत नाहीत. जरा वयाचं भान ठेवा,” अशा थेट शब्दांत राऊतांनी राणेंवर निशाणा साधला.
राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीचा निर्णय फडणवीस सरकारने मागे घेतल्यानंतर ठाकरे गट आणि मनसे यांच्यातर्फे ५ जुलैला ‘विजयी मेळाव्याचं’ आयोजन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, “ठाकरे बंधू एकत्र आल्याने काही विशेष फरक पडणार नाही. २० + ० हेच त्यांचं समीकरण,” अशी उपरोधिक टीका नारायण राणेंनी केली होती. या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, “राणेंनी पक्ष बदलण्याचा विक्रम केला आहे. शिवसेना, काँग्रेस, भाजप – सर्वत्र त्यांनी फक्त गोंधळ केला. स्वतःचा पक्षही चालवता आला नाही. अशा व्यक्तीला महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही.”
राऊत पुढे म्हणाले, “राणेंनी भाजपमध्ये जाऊन कोकणातील मराठी जनतेचं नुकसान केलं आहे. भाजपमध्ये गेलेला प्रत्येक माणूस महाराष्ट्राचा शत्रू आहे, असं मी समजतो. महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर प्रवचन झोडण्याचा त्यांना अधिकार नाही.”
राऊतांनी पुढे स्पष्ट शब्दांत सुनावलं, “सगळे गुलाम नसतात. सर्वचजण आपली चामडी वाचवायला पक्ष बदलत नाहीत. काही स्वाभिमानी लोक शेवटपर्यंत आपली भूमिका ठामपणे मांडतात. त्यामुळेच आज महाराष्ट्र टिकून आहे. तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र नाही, आणि भाजपा आहे म्हणूनही महाराष्ट्र नाही.”
राऊतांनी भाषणाचा शेवटही तितक्याच कडवट शब्दांत केला. “कोट घालता, टाय लावता म्हणून लोक ऐकत नाहीत. जरा वयाचं भान ठेवा. भविष्यात कोण काय आहे, हे सगळ्यांनाच कळेल,” असा इशाराही त्यांनी दिला.