संजय राऊतांचं फडणवीसांना थेट पत्र, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप

0
98

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई – “भ्रष्टाचार, जनतेची फसवणूक या मुद्द्यांवर आपण नेहमी बोलता, पण वास्तवात सरकारचं कुंपणच शेत खात आहे,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत एक थेट आणि तिखट पत्र लिहिलं आहे. या पत्रात राऊतांनी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर शासकीय जमिनी आणि खनिज उत्खननासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत.

 

राऊतांनी पत्रात म्हटलंय की, “आपल्या सभोवतालचे काही लोक सरकारला पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात सरकारी तिजोरीवरच डल्ला मारत आहेत. सुनील शेळके यांनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खाण उत्खनन केलं आहे. त्यासाठी कोणतीही रॉयल्टी शासनाला भरलेली नाही.”

 

राऊतांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कडून मावळ तालुक्यातील आंबळे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात येत आहेत. परंतु शेळके कुटुंबियांच्या मालकीच्या गट नंबर १२३, १२५, १४९, १५२, १५३/१, १५४, १५८, १७१/२, आणि १९५ या जमिनी जाणीवपूर्वक MIDC कडून संपादित करून त्यांच्या बदल्यात पर्यायी जागेची मागणी करण्यात आली आहे.

 

या प्रकरणात राऊतांनी दावा केला आहे की, “सदर जमिनी औद्योगिक वापरासाठी उपयुक्त नाहीत. त्या परिसरात आधीच दगडखाणी चालू आहेत आणि त्या खाणीत खोल खड्डे पडले आहेत. तरीही शासन निर्णय काढून त्या जागा संपादित करण्यात आल्या आणि बदली म्हणून इतर उपयुक्त जमिनी दिल्या जात आहेत. हा प्रकार अतिशय संशयास्पद असून, यामध्ये राजकीय हस्तक्षेप स्पष्टपणे जाणवतो.”

 

राऊतांनी पत्रात यावर प्रश्न उपस्थित करत विचारलं आहे की, “साध्या शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी, राहती घरे सरकारने संपादित केलीत, पण त्यांना कधीच बदली जागा देण्यात आली नाही. मग हे न्यायाचे निकष केवळ सुनील शेळके व त्यांच्या कुटुंबापुरतेच का लागू होतात?”

 

या प्रकरणात हजारो कोटी रुपयांच्या रॉयल्टीची बुडवणूक झाल्याचा गंभीर आरोप करत राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तातडीने चौकशीचे आदेश देण्याची मागणी केली आहे. राज्य शासनाच्या आणि MIDCच्या भूमिकेबाबत देखील त्यांनी सवाल उपस्थित केले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here