
मुंबई | प्रतिनिधी
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या महाराष्ट्रविरोधी वक्तव्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आज जोरदार हल्लाबोल केला. विधानसभेतून ते पत्रकार परिषद घेऊन तसेच माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली.
“महाराष्ट्रात जर एखाद्या नागरिकाला मराठी भाषेसाठी मोर्चा काढायचा असेल आणि त्यालाही परवानगी दिली जात नसेल, तर हे सरकार नेमकं चालवतंय कोण?” असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.
मीरा-भाईंदर मराठी भाषा मोर्च्यावरून संताप
मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषा जपण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. या निर्णयावरुन राऊत म्हणाले,
“मीरा-भाईंदरचा विषय अत्यंत गंभीर आहे. कोणाच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाला परवानगी नाकारली? मराठी माणूस जर इथेच मोर्चा काढू शकत नसेल, तर तो नक्की जायचं कुठे?”
राऊतांनी यावेळी पोलीस अतिरेकाचा आरोप करत सांगितलं की,
“पहाटे दोन ते तीन वाजता मनसेचे नेते, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नोटीसा बजावल्या गेल्या. हे महाराष्ट्र आहे की आणीबाणी?”
फडणवीसांवर ‘मोरारजी देसाई’ची उपमा देत जोरदार टीका
संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करत म्हटलं,
“पुन्हा एकदा मोरारजी देसाईंचा आत्मा फडणवीस यांच्या शरीरात गेला आहे. त्यांनी मराठी माणसावर गोळ्या चालवून १०६ हुतात्म्यांचा इतिहास घडवला होता, आणि आज त्याच पद्धतीने कारवाई केली जातेय. हे अत्यंत धोकादायक आणि दु:खदायक आहे.”
निशिकांत दुबेंवर टीकास्त्र : “महाराष्ट्रद्वेष करणाऱ्यांना माफ करणार नाही!”
संजय राऊतांनी भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या विधानांचा जोरदार निषेध केला.
“निशिकांत दुबे भाजपचा खासदार आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा खास माणूस आहे. त्याने महाराष्ट्राविषयी आणि मराठी माणसाविषयी अत्यंत घाणेरड्या आणि अपमानास्पद शब्दांत वक्तव्य केलं आहे.”
“हा माणूस काय समजतो स्वतःला? मराठी माणसाला आपण पटकन चिरडू शकतो असं त्याला वाटतं? उद्योजकांची दलाली करून आणि बूट चाटून जे काही मिळवतो त्याचं स्वप्न महाराष्ट्रात पाहू नये. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे असं चालत नाही!”
डुप्लिकेट शिवसेना, अर्धी दाढी आणि जनतेचा संताप
शिवसेनेच्या नावावरून सुरु असलेल्या वादावरुनही राऊतांनी घणाघात केला.
“डुप्लिकेट शिवसेना कुठे आहे? अर्ध्या दाढीवरून हात फिरवणारे आता अर्धी दाढी घेऊन फिरतील. महाराष्ट्रात जनतेचा इतका संताप आहे की हे सगळं आता चालणार नाही. लोकं रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.”
“फेक डिग्री घेऊन संसदेत बसलेला दुबे” – आरोप
दुबेंवर व्यक्तिशः टीका करताना राऊत म्हणाले,
“हा माणूस फेक डिग्री घेऊन संसदेत बसला आहे. महुआ मोईत्रा यांची जुनी मुलाखत पाहा, दुबेकडे दिल्ली विद्यापीठाची खोटी डिग्री आहे. जसा गुरु तसा चेला.”
“हे सरकार आम्हाला धडे देणार? एकीकडे आमच्यावर कारवाई, दुसरीकडे महाराष्ट्रविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना पाठीशी घालणं – हे कितपत योग्य आहे?”
मुख्यमंत्र्यांचे मौन खटकणारे
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरही राऊतांनी निशाणा साधला.
“या राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ तोंडात बोळा घालून बसलंय. महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला होतोय आणि तुम्ही शांत? महाराष्ट्र हे सहन करणार नाही.”