
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई – धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रोकड प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी आज महायुती सरकारवर जोरदार टीका केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याप्रकरणी पुरावे नष्ट होण्याचा गंभीर आरोप केला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली.
संजय राऊत म्हणाले, “धुळे येथील विश्रामगृहात सापडलेली रोकड ही सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याऐवजी त्वरित गुन्हा दाखल व्हायला हवा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी ईडीची चौकशी का लावली नाही?”
राऊत यांनी अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यावरही थेट आरोप करत म्हटले की, “खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृहांमध्ये पैसे जमा करण्याचा डाव झाला. समिती कुठे कुठे गेली, कुठे थांबली, कोणत्या हॉटेलमध्ये पैसे वाटप झाले, याची माहिती माझ्याकडे आहे आणि ती मी फडणवीस यांना देण्यास तयार आहे.”
“या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याची तयारी सुरु आहे. एकनाथ शिंदे आणि शासकीय अधिकारी यासाठी जबाबदार असतील,” असा आरोप करत राऊत म्हणाले, “एसआयटीच्या चौकशीला कोणती कालमर्यादा आहे? अहवाल कधी येणार? हे स्पष्ट करावे.”
या प्रकरणामुळे महायुती सरकारची अडचण वाढली आहे. माजी आमदार अनिल गोटे यांच्याही आरोपांनी प्रकरण अधिकच गडद झाले आहे. कोट्यवधींची रोकड, मंत्रीखासदारांचा सहभाग आणि सरकारची भूमिका यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. सध्या एसआयटीमार्फत चौकशी सुरु असली तरी विरोधकांचा विश्वास बसत नसून, प्रकरण सीबीआय किंवा ईडीकडे सोपवावे, अशी जोरदार मागणी होत आहे.