
माणदेश एक्सप्रेस न्यूज : विटा/प्रतिनिधी : खानापूरच्या राजकारणात आमदार सुहास बाबर यांनी आज मोठा मास्टर स्ट्रोक मारला. तालुक्यातील पाटील गटाचे एकमेव माजी पंचायत समिती सदस्य संजयकुमार मोहिते यांनी आज मुंबई येथे त्यांच्या शेकडो समर्थकांसह आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. या राजकीय उलथपालथीमुळे पाटील गटाला मोठा हादरा बसला आहे. या प्रवेशावेळी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल दादा बाबर उपस्थित होते.
मोहिते यांच्या शिवसेना प्रवेशाने पाटील गटाला तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे भाळवणी गटातील राजकीय समीकरणे बदलली गेली आहेत. मागील पंचायत समिती निवडणुकीत खानापूर तालुक्यातील भाळवणी गणातून माजी आमदार सदाशिवराव पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची संजयकुमार मोहिते यांच्या रूपाने एकमेव जागा निवडून आली होती. मोहिते यांनी आज शिवसेनेत प्रवेश करून पाटील गटाला मोठा धक्का दिला आहे. युवक नेते अमोल बाबर हे मोहिते व त्यांच्या समर्थकांच्या संपर्कात होते. त्यांनी अत्यंत यशस्वी शिष्टाई करत ही जबरदस्त राजकीय खेळी केली.
स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी आपल्या मतदारसंघात विकासाची गंगा आणली आहे. आमदार सुहास बाबर यांच्या कामाचा झंजावात आपण सर्वजण पाहतो आहे. आमदार सुहासभैय्या बाबर हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पदाधिकारी म्हणून कार्यरत असताना आपण विरोधात असून देखील त्यांनी जे काम केले ते खरोखरच तालुक्याच्या विकासात योगदान देणारे आहे. आपल्या परिसराचा कायापालट खऱ्या अर्थाने करायचा असेल तर आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली काम करणे योग्य ठरेल. राजकारणात कार्यकर्त्यांना सन्मान कसा द्यायचा, त्यांच्या हाकेला धावून कसे जायचे आणि जनतेला प्रमाण म्हणून कसे काम करायचे याचे एक चांगले उदाहरण म्हणजे बाबर बंधू आहेत. त्यामुळेच आपण हा निर्णय घेतला आहे. भविष्यात आमदार सुहास बाबर यांची घौडदौड कोणी रोखू शकत नाही याची आम्हाला पुरेपूर खात्री झाली आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय आम्ही आज घेत आहोत. अशा प्रतिक्रिया मोहिते यांनी यावेळी व्यक्त केली.
माजी पंचायत समिती सदस्य संजयकुमार मोहिते यांनी आज जो निर्णय घेतला आहे त्याचा आदर राखत शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेली विकासकामे पाहून अनेक कार्यकर्ते प्रभावित होत आहेत. मोहिते व त्यांच्या समर्थकांचा आज जरी मुंबई येथे प्रवेश झाला असला तरी लवकरच खानापूर तालुक्यात एक मोठा मेळावा घेणार आहे. त्यांच्या प्रवेशाने आपल्या पक्षाला आणखी चांगले बळ मिळेल.अशी प्रतिक्रिया आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केली.
संजयकुमार सदाशिव मोहिते, यांच्यासह आज शिवसेना प्रवेश केलेल्या भाळवणी सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन राजाराम रामचंद्र निकम, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संपत नामदेव शिंदे, माजी सरपंच अमोल नामदेव माळी, माजी सरपंच निजाम होबळे, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव लक्ष्मण शिंदे, माजी व्हा. चेअरमन विलास नारायण माळी, माजी व्हा. चेअरमन दादासो बजरंग शिरतोडे, यांच्यासह सचिन धोंडीराम चव्हाण, अशोक सदाशिव माळी, हर्षल महादेव शिरतोडे, रमेश तुकाराम सावंत, या ग्रामपंचायत सदस्यांनी तसेच सोसायटी चे संचालक संजय मारुती अदाटे, लुकमान नूरजमान शिकलगार, शिवप्रताप बँकेचे संचालक गणेश बजरंग अदाटे, खानापूर तालुका गुरव समाजाचे अध्यक्ष मनोज प्रकाश गुरव, निवास रामचंद्र धनवडे, संतोष रामचंद्र कुंभार, नितीन सदाशिव मोहिते, दिग्विजय प्रकाश घोरपडे, मच्छिंद्र धोंडीराम शिंदे, अमित महादेव शिंदे, निखिल सुनील कुंभार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.