माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगली येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यातील मनिषा नितीन कोंगनोळीकर (भडेकर) या महिला हवालदाराला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी व चौकशीत मदत करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
याबाबत माहिती अशी : तक्रारदार यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल आहे. या तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरिता आणि यातील तक्रारदार यांच्या विरुद्धच्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्याकरिता विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनिषा नितीन कोंगनोळीकर (भडेकर) यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदारने याबाबत सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची शहानिशा केली. यामध्ये संबंधित महिला पोलिसाने तक्रारदाराला 50 हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर तक्रारदाराला पैसे घेऊन संबंधित महिला पोलिसाकडे पाठवण्यात आले. यावेळी संबंधिताने तक्रारदाराकडून पैसे स्वीकारले. याचवेळी त्याठिकाणी सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर झडप घातली. पैसे घेताना मनीषा कोंगनोळीकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
याप्रकरणी पोलीस हवालदार मनिषा नितीन कोंगनोळीकर (भडेकर) यांच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.