
माणदेश एक्सप्रेस न्यूज | तासगाव :
‘मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषात दुमदुमणारी नगरी, गुलाल-पेढ्यांची उधळण, ढोल-ताशांच्या गजरात भारावलेले वातावरण आणि लाखो गणेशभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग… अशा दैवी वातावरणात तासगावचा ऐतिहासिक २४६ वा रथोत्सव सोहळा गुरुवारी उत्साहात संपन्न झाला. परंपरा, श्रद्धा आणि भक्ती यांचा मिलाफ घडवणारा हा सोहळा यावर्षीही अविस्मरणीय ठरला.
पंचायतनचे विश्वस्त श्रीमंत राजेंद्र पटवर्धन व डॉ. आदिती पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी पटवर्धन राजवाड्यातून सर्व मानकरी व मान्यवरांसह छबिना बाहेर पडला.
श्री गणपती मंदिरातील तब्बल १२१ किलो वजनाची पंचधातूची ‘श्री’ची उत्सवमूर्ती पालखीतून मंदिराबाहेर आणून अलंकृत रथात विराजमान करण्यात आली. उत्सवानंतर प्रथेनुसार श्रींची आरती झाली. राष्ट्रगीताच्या गजरात नेमके दुपारी एक वाजता रथ ओढण्यास सुरुवात झाली.
लाखो गणेशभक्तांनी ‘मोरया…’च्या जयघोषात दोऱ्याला हात लावून रथ ओढण्याचा मान मिळवला. गुलाल, पेढे, खोबरे यांच्या उधळणीत संपूर्ण परिसर लाल गेरूमय झाला. रथ फुलांच्या माळा, केळीचे खुंट, नारळाची तोरणे आणि रंगीबेरंगी पताकांनी सजविण्यात आला होता.
यात्रा मार्गावर नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा सुंदर रांगोळ्या काढून रथाचे स्वागत केले. ठिकठिकाणी भक्तांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
परंपरेनुसार रथ श्री गणपती मंदिरापासून श्री काशिविश्वेश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आला. येथे श्री शंकर व श्री गणपती या पिता-पुत्राची प्रतीकात्मक भेट घडली. श्रींची आरती झाल्यानंतर रथाचा परतीचा प्रवास सुरू झाला.
सायंकाळी दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जनही भक्तीभावात पार पडले.
सकाळपासूनच गणेशमंदिरात दर्शनासाठी व रथावर नारळाचे तोरण बांधण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. रथोत्सव मार्गावर गुरुवार पेठ ते बसस्थानक चौकापर्यंत यात्रा भरली होती.
सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन केले. पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले, निरीक्षक सोमनाथ वाघ, तहसीलदार अतुल पाटोळे, मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांच्यासह अधिकाऱ्यांनी संपूर्ण सोहळ्याचे बारकाईने नियोजन केले होते.
या ऐतिहासिक रथोत्सवात परिवहन मंत्री शंभूराज देसाई, आमदार रोहित पाटील, माजी खासदार संजय पाटील, प्रभाकर पाटील, पटवर्धन कुटुंबीय, मानकरी तसेच लाखो गणेशभक्त उपस्थित होते.
तासगाव नगरीत २४६ वर्षांपासून अखंड चालत आलेली रथयात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नसून श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि भक्तिभावाचा अनोखा संगम आहे.
यावर्षीचा सोहळा भक्तांच्या उत्साहाने, प्रशासनाच्या नियोजनाने आणि परंपरेच्या ठसक्याने अविस्मरणीय ठरला.