
माणदेश एक्सप्रेस न्यूज | तासगाव :
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळज येथे समाजमाध्यमावर मैत्रिणीचा व्हिडीओ व्हायरल केल्याच्या संशयावरून एका २५ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी तिघांविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. जखमी आकाश काशिनाथ शिरतोडे (वय २५, रा. सावळज) याने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून राज गजानन फासे, दीक्षांत गजानन फासे आणि कृष्णत दत्तात्रय फासे (सर्व रा. सावळज) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश शिरतोडे हा सावळज-डोंगरसोनी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये गेला असताना ही घटना घडली. यावेळी आरोपी राज गजानन फासे याने आकाश याला हटकले. ‘तू आपल्या मैत्रिणीचा व्हिडीओ तयार करून तो समाजमाध्यमावर व्हायरल केला आहेस’, असा आरोप करीत त्याने आकाशला शिवीगाळ केली. एवढ्यावर न थांबता त्याने फरशीने आकाशच्या डोक्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले.
दरम्यान, या वादात दीक्षांत फासे व कृष्णत फासे हेही सहभागी झाले. दोघांनी मिळून आकाशच्या छातीवर व पाठीवर लोखंडी गजाने मारहाण केली. मारहाणीमुळे आकाश जखमी झाला. हल्ल्यानंतर संशयितांनी ‘तुला आता सोडतो, पण पुन्हा नादी लागलास तर जिवे ठार करू’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आकाशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या डोक्याला व शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी राज, दीक्षांत व कृष्णत या तिघांविरुद्ध मारहाण, धमकी तसेच संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास तासगाव पोलिस ठाण्याचे पथक करीत आहे.