
दिघंची (ता. आटपाडी) :
सोशल मीडियावर आलेल्या संशयास्पद लिंक्सवर क्लिक केल्याने आटपाडी तालुक्यातील दोन खातेदारांना तब्बल सात लाख पंचवीस हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा बसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्हाट्सअॅपवर बँकेच्या नावाने आलेल्या संदेशांमुळे या दोघांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सायबर शाखेकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे तालुक्यातील बँक ग्राहकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.
झरे (ता. आटपाडी) येथील रोहित संजय सुतार यांना काही दिवसांपूर्वी व्हाट्सअॅपवर बँकेच्या नावाने एक संदेश प्राप्त झाला. हा मेसेज खरा असल्याचा समज झाल्याने त्यांनी लिंक उघडली. काही क्षणातच त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून ९४ हजार रुपये वळते झाल्याचा मेसेज आला.
पुण्यात नोकरी करणारे व मूळचे विभूतवाडी येथील पोपट खर्जे यांच्याकडेही अशाच प्रकारे एक लिंक आली. त्यांनी ती उघडताच काही सेकंदांतच त्यांच्या खात्यातून तब्बल सहा लाख एकतीस हजार रुपये गहाळ झाल्याचे मेसेज त्यांच्या मोबाईलवर येऊ लागले.
घाबरलेल्या खर्जे यांनी तत्काळ पुणे येथील सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार नोंदवली.
मागील आठ दिवसांत आटपाडी तालुक्यात अशा प्रकारची तीन प्रकरणे घडली आहेत. याआधी झरे येथील एका खातेदाराच्या खात्यातून १२ हजार ७०० रुपये गहाळ झाले होते. आता थेट ७ लाखांहून अधिक रक्कमेची फसवणूक झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दरम्यान, मागील दोन दिवसांपूर्वी ‘पीएम किसान योजना’ या नावाने एक फाईल व्हाट्सअॅपवर फिरत असल्याचे निदर्शनास आले. अनेकांनी यादीत आपले नाव आहे का, हे पाहण्यासाठी ती फाईल उघडली. त्याचा परिणाम म्हणून अनेकांच्या मोबाईल फोनमध्ये हॅकिंग झाल्याची माहिती समोर आली आहे.
सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद लिंक्स, अज्ञात संदेश अथवा बँकेच्या नावाने आलेल्या फाईल्स उघडू नये, असे आवाहन केले आहे. तसेच अशा कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीची घटना घडल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाणे किंवा सायबर शाखेशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.