
माणदेश एक्सप्रेस न्यूज / सांगली : सांगली शहराच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली असून, शहरातील माजी नगरसेवक श्रीम. स्नेहलताई सावंत, अभिजित भोसले, नसीमा नाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
नव्याने पक्षात दाखल झालेल्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त केला. सांगली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः शहरी विकास, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रभावीपणे भूमिका घेत असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रवेशामुळे काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील गटाला मोठा धक्का मानला जात आहे. सांगली शहरात पूर्वी विविध पक्षांशी संलग्न असलेले आणि निवडणुकांमध्ये प्रभाव असलेले हे चेहरे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये दाखल झाल्याने आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांचे स्वागत करत, आगामी काळात संघटना अधिक मजबूत करून जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला. सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा वाढता प्रभाव येत्या निवडणुकांत महत्त्वाची भूमिका बजावेल, हे स्पष्ट झाले आहे.


