लाच प्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्त निलंबित; नगरविकास विभागाची कारवाई

0
96

माणदेश एक्सप्रेस न्यूज|सांगली – सात लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात अडकलेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर नगरविकास विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. ९ जूनपासून पोलिस कोठडीत असलेल्या साबळे यांना तात्पुरते निलंबित करण्यात आले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर ही अधिकृत पावले उचलण्यात आली आहेत.

 

उपायुक्त वैभव साबळे यांनी सांगलीतील एका २४ मजली इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या परवान्यासाठी ७ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदार तानाजी रुईकर यांनी ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यानंतर पथकाने सापळा रचून साबळे यांना अटक केली होती.

 

संबंधित प्रकरणाचा अहवाल महापालिकेकडून तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नगरविकास विभागाला प्राप्त झाला होता. त्यावर तातडीने कारवाई करत साबळे यांना ९ जूनपासून निलंबित करण्यात आलं असल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे.

 

वैभव साबळे हे सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असून, त्यांच्या विरोधात अशी गंभीर कारवाई झाल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्येही या प्रकरणाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, प्रशासनातील भ्रष्टाचाराबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here