
माणदेश एक्सप्रेस/ इस्लामपूर : स्वत:ची मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असतानाही बापाने तिचे चार महिन्यांपूर्वी लग्न लावून दिले. तिचे नशीब फुटके असेल म्हणून तिला एवढ्या लहान वयात सासरच्या मंडळींनी मारहाण आणि शिवीगाळ करत तिचा जाच केला. एवढ्या लहान वयात हे भोग भोगणाऱ्या पीडित मुलीने धाडसाने पोलिसांचे दार ठोठावले. त्यातून तब्बल सहा जणांविरुद्ध बाल विवाह आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाळवा तालुक्यातील एका गावात ही अघोरी घटना मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात घडली. पीडित मुलीचे आईचे निधन झाले आहे. ही मुलगी इयत्ता आठवीत शिकणारी आहे. वडिलांनी एका मध्यस्थ महिलेच्या पुढाकाराने तिचे लग्न लावून दिले. त्यानंतर ११ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ या कालावधीत पती, सासू आणि सासऱ्याकडून झालेला जाचहाट असह्य झाल्यावर या कारनाम्याला वाचा फुटली.
पीडित मुलीने पोलिसात फिर्याद दिल्यावर लग्नासाठी मध्यस्थी करणारी भागा मावशी आणि लग्न लावून देणाऱ्या विद्याधर (दोघांची पूर्ण नावे नाहीत) यांच्यासह वडील आणि सासरकडील ६ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ९, १०, ११ व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या बापाने मागील डिसेंबर महिन्यात लग्न लावून दिले. त्यांनतर या नकळत्या वयातील मुलीच्या नशिबी सासुरवास आला. लग्न करून बाप मोकळा झाला होता, मात्र भोग या मुलीच्या वाट्याला आले.
सासरच्या मंडळींनी तिला मारहाण करण्यासह शिवीगाळ करत तिचा जाच केला. ही मुलगी ४ महिने हा जाच सहन करत राहिली; पण, शेवटी तिच्या बाळबोध भावनेचा बांध फुटला. त्यावेळी तिने थेट पोलिसात धाव घेत आपल्यावर आलेल्या संकटाची आपबीती सांगितली. त्यावर पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्योती सूर्यवंशी करत आहेत.