
माणदेश एक्सप्रेस न्यूज | तासगाव :
सांगली जिल्ह्यातील मांजर्डे (ता. तासगाव) गावात घडलेली एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी घरात खेळत असताना पाण्याच्या बादलीत पडल्याने एका वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत्यू झालेल्या मुलीचं नाव तन्वी शिवाजी कदम (घोटकर) (वय १ वर्ष) असं आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तन्वी घरात नेहमीप्रमाणे रांगत-खेळत होती. त्या वेळी आई घरकामात गुंतली होती. खेळता खेळता ती पाण्याने भरलेल्या बादलीजवळ गेली आणि त्यामध्ये पडली. काही क्षणातच ही दुर्घटना घडली.
घटनेची जाणीव होताच आईने तातडीने मुलीला बादलीतून बाहेर काढले. तिने तत्काळ पतीस दूरध्वनी करून बोलावून घेतले. कुटुंबीयांनी घाईघाईने तन्वीला तासगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
तन्वी ही शिवाजी कदम यांची एकुलती एक मुलगी होती. आई-वडिलांची लाडकी आणि आजी-आजोबांची डोळ्यांची पारणी असलेली ही चिमुकली घरात सतत बागडत असे. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबियांसह गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. “पोटच्या गोळ्याला गमावल्याचं दुःख शब्दांत मांडता येणार नाही,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
गावातील पत्रावस्ती भागात राहणाऱ्या कदम कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निष्पाप बालिकेच्या मृत्यूने संपूर्ण गाव शोकाकुल झाले असून गावकऱ्यांनी कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला.


