
माणदेश एक्सप्रेस न्युज | सांगली :
आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकनेते स्व. राजारामबापू पाटील व त्यांचे पुत्र आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज, सोमवारी सांगलीत ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा’ काढण्यात येत आहे. या मोर्चामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यातील दिग्गज नेते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी दिली.
देवराज पाटील म्हणाले की, “आमदार पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात केलेले वक्तव्य हे अतिशय निंदनीय आहे. या वक्तव्याचा निषेध सर्व स्तरातून होत आहे. त्यामुळे राजारामबापू व वसंतदादा पाटील यांच्या विचारांचे अनुयायी, तसेच महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपणारे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत.”
पाटील यांनी पुढे सांगितले की, जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठीच पडळकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यामुळेच सांगलीची आणि महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार विशाल पाटील, बजरंग सोनवणे, निलेश लंके, अमोल कोल्हे, आमदार विश्वजित कदम, उत्तम जानकर, जितेंद्र आव्हाड, रोहीत पवार, रोहीत पाटील, भास्कर भगरे यांच्यासह अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणराजे होळकर सहभागी होणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे.
मोर्चाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून होऊन राममंदिर चौक, पंचमुखी मारुती रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कापडपेठ, भारती विद्यापीठ मार्गे स्टेशन चौक येथे होणार आहे. तेथे सर्व नेते मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या वेळी पक्ष निरीक्षक शेखर माने, संजय बजाज, सागर घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, आमदार पडळकर यांच्या वक्तव्याबाबत सत्ताधारी गटातील नेत्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खासगीत त्यांनी पडळकरांविषयी रोष व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी आणि वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काही सत्ताधारी नेतेही या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता असल्याचे देवराज पाटील यांनी सांगितले.


