विनयभंगाचा जाब विचारल्याने कुटुंबावर तरुणांचा चाकूहल्ला : तिघे जखमी

0
254

माणदेश एक्सप्रेस न्यूज | सांगली :
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात चाकूहल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेशी गैरवर्तन करून विनयभंग करणाऱ्या दोघा संशयित तरुणांना जाब विचारल्याने पीडित महिलेच्या कुटुंबावर चाकू हल्ला करण्यात आला. या घटनेत पीडितेचा पती गंभीर जखमी झाला असून, तिचा मामे भाऊ आणि स्वतः महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. शहरातील गजबजलेल्या भागात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.


पीडित महिला मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या पती, मामा, मामे भाऊ आणि इतर नातेवाईकांसह गणपती विसर्जनासाठी हातगाड्यावरून निघाली होती. एका शाळेजवळ आल्यावर महिला व तिच्यासोबत असलेली तरुणी गाड्याच्या पाठीमागून चालत होती.

अचानक 20 ते 25 वयोगटातील दोन अज्ञात तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांनी महिलेशी लगट करून विनयभंग केला. या घटनेमुळे महिलांनी आरडाओरडा केला. त्यावर कुटुंबीयांनी त्या दुचाकीस्वारांना अडवून जाब विचारला.


जाब विचारल्यामुळे संशयित आक्रमक झाले. त्यांनी प्रथम पीडितेच्या पतीला आणि मामे भावाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पीडिता मध्यस्थी करण्यासाठी आली. यावेळी एका तरुणाने जवळील चाकू काढून पीडितेच्या पतीच्या पाठीवर व मानेवर वार केला.

महिलेच्या मानेवर देखील चाकू ठेवून धमकावण्यात आले आणि हातावर वार झाला. इतकंच नव्हे तर मामे भावालाही चाकूने वार करण्यात आला.

यानंतर आरोपी दुचाकी घेऊन घटनास्थळावरून फरार झाले.


या हल्ल्यात पीडितेचा पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीडिता आणि तिचा मामे भाऊ किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.


पीडितेच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कार्यरत असून सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन तपासाची दिशा निश्चित केली जात आहे.


गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात झालेल्या या घटनेमुळे सांगलीत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भरवस्तीत महिलेशी गैरवर्तन करून नंतर थेट चाकूहल्ला करण्याच्या धाडसामुळे पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here