
माणदेश एक्सप्रेस न्यूज | शिराळा :
मराठा आरक्षणाच्या लढ्याला सर्वच स्तरांतून पाठिंबा मिळत असताना सांगली जिल्ह्यातील एका चित्रकाराने आपल्या कलेतून आगळीवेगळी साथ दिली आहे. चिंचोली येथील सुप्रसिद्ध पिंपळपान चित्रकार अशोक जाधव यांनी आपल्या रक्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा साकारून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
जाधव यांनी आजवर पिंपळाच्या नाजूक व जाळीदार पानांवर शेकडो कलाकृती रेखाटल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी स्वतःचे रक्त वापरून कलेतून मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. विशेष म्हणजे या पिंपळपानावर छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले, तलवार उगारून मोहीम फत्ते करण्यास निघालेले दाखवले आहेत. त्याचबरोबर शेजारीच मनोज जरांगे-पाटील यांची प्रतिमा उभी करून आरक्षणासाठीची मोहीम ‘फत्ते’ करण्याचा संदेश दिला आहे.
चित्रकार जाधव यांनी कलाकृतीमागील विचार स्पष्ट करताना सांगितले की,
“गौतम बुद्धांनी पिंपळाच्या वृक्षाखाली बसून जगाला शांततेचा संदेश दिला. शिवाजी महाराजांनी ध्येय, शौर्य आणि निर्धार यावर उभी ठाकलेली साम्राज्य उभारणी केली. त्याच निर्धाराने आणि शांततेच्या मार्गावर चालत आज मनोज जरांगे आरक्षणाचा लढा लढत आहेत. म्हणूनच मी ही कलाकृती पिंपळाच्या पानावरच रेखाटली आहे.”
मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उभी ठाकलेली ही अनोखी कलाकृती मराठा बांधवांत चर्चेचा विषय ठरली आहे. स्थानिकांपासून सोशल मीडियापर्यंत ही कलाकृती मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून, एका कलाकाराने आपल्या रक्तातून आंदोलनाला दिलेली ही साथ अभूतपूर्व ठरली आहे.
कलाविश्वात अनेक माध्यमांतून अभिव्यक्ती होत असते, पण अशोक जाधव यांनी रक्त आणि पिंपळपान या दोन प्रतीकात्मक माध्यमांचा वापर करून इतिहास, अध्यात्म आणि सध्याचा सामाजिक लढा एकाच कॅनव्हासवर मांडला आहे. त्यामुळे ही कलाकृती केवळ कला नसून मराठा समाजाच्या भावनांचे जिवंत प्रतीक बनली आहे.