सांगलीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई ; तिघांना अटक, हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त

0
69

माणदेश एक्सप्रेस न्यूज | सांगली :
सांगलीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत बुधगाव आणि शहरातील कत्तलखाना परिसरात छापे टाकले. या कारवाईत तिघांना ताब्यात घेत 6 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परंतु शहर व परिसरातील इतर अनेक जुगार अड्डे मात्र पोलिस कारवाईच्या प्रतीक्षेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

या छाप्यात शिराज फरदिन पाथरवट (वय 55, रा. सांगली), फारूख मुजावर (रा. गणेशनगर, सांगली) आणि इम्रान रियाज जमादार (वय 42, रा. खणभाग, सांगली) अशी नावे समोर आली आहेत. शिराज आणि फारूक हे सांगली शहरातील कत्तलखाना परिसरात अड्डा चालवत होते, तर इम्रान हा बुधगाव येथे जुगार अड्डा चालवत होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापे टाकून ही कारवाई केली.


जुगार व्यवसाय सांगली शहरापुरता मर्यादित नाही. मिरज तालुक्यातील अनेक गावांमध्ये, तसेच शहरातील पश्चिम भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्यांतसुद्धा खुलेआम जुगार सुरू असल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांनी या अड्ड्यांविरोधात वारंवार तक्रारी केल्या, तरी कारवाईचा अभाव असल्याने हा व्यवसाय फोफावतो आहे.


“जुगार अड्ड्यांमुळे समाज बिघडतो, तरुण वर्ग भुरळला जातो. दिवसभर सुरू असलेली ही बेकायदेशीर धंद्याची ठिकाणे पोलिसांच्या नजरेस कशी पडत नाहीत?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. बुधगाव आणि कत्तलखाना परिसरातील छापे स्वागतार्ह असले, तरी शहरातील इतर अड्ड्यांवरही तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


अनेक नागरिकांचे म्हणणे आहे की काही जुगार अड्ड्यांना स्थानिक पातळीवर “संरक्षण” मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे या अड्ड्यांच्या मुळावर घाव घालायचा असेल तर पोलिसांनी सर्व अड्ड्यांवर एकाच वेळी धडक कारवाई करावी, अन्यथा समाजबिघाड रोखणे कठीण होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here