
माणदेश एक्सप्रेस न्यूज|सांगली – काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या उपायुक्त वैभव विजय साबळे यांना ७ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आता या प्रकरणात तत्कालीन आयएएस अधिकारी शुभम गुप्ता यांचंही नाव पुढे येत आहे. तक्रारदार तानाजी रूईकर यांनी गुप्तांवर थेट लाच मागितल्याचा आरोप करत त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.
प्रकरणाचा विस्तार
रूईकर यांच्या म्हणण्यानुसार, सांगलीतील २४ मजली इमारतीच्या परवानगीसाठी आवश्यक असलेली फाईल शुभम गुप्ता यांनी वारंवार कारणं दाखवून खाली पाठवली. हे सर्व लाच मागण्यासाठीच केलं गेलं, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, या प्रकल्पातून महापालिकेला तब्बल २ कोटी रुपयांचा महसूल मिळणार होता, तरीही अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर अडथळा निर्माण केला.
गुप्तांचे वादग्रस्त कारनामे उघड
शुभम गुप्ता यांच्यावर याआधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. गडचिरोलीमध्ये कार्यरत असताना आदिवासी गायी-म्हशी योजनेतील निधीचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. सांगलीत रुजू झाल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या २००-२५० कोटींच्या ठेवी राष्ट्रीय बँकेऐवजी खासगी बँकेत वळविल्या, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी केला आहे.
साखळकर यांच्या मते, गुप्ता यांनी महापालिकेच्या आपत्कालीन निधीतून स्वतःसाठी वाहन खरेदी केली होती. तसेच, मक्तेदारांचे चेक १५-१७ टक्के टक्केवारी घेतल्याशिवाय काढले जात नव्हते, असंही ते म्हणाले. भूमी संपादनाच्या संदर्भातही विवादास्पद निर्णय घेऊन संशयास्पद रकमेचे वाटप झाल्याचे आरोप गुप्तांवर आहेत.
राजकीय प्रतिक्रिया
या प्रकरणावरून सांगलीतील आमदार सुधीर गाडगीळ व खासदार विशाल पाटील यांनी यापूर्वीच गुप्तांच्या कारभारावर आक्षेप घेतला होता. त्यांच्या कार्यपद्धतीवर सतत प्रश्न उपस्थित केले जात होते. परिणामी, गुप्तांची सांगलीतून तात्काळ बदली करण्यात आली होती.
चौकशीची गरज अधोरेखित
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. आता शुभम गुप्ता यांना सहआरोपी म्हणून तपासात समाविष्ट करावे, अशी जोरदार मागणी नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून होत आहे.