
माणदेश एक्सप्रेस न्यूज | आटपाडी (सांगली) :
आई-वडिलांना देव मानणाऱ्या संस्कृतीत आपल्या जन्मदात्या बापालाच घराबाहेर काढल्याची संतापजनक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात उघडकीस आली आहे. संपत्तीच्या हव्यासाने सुनेच्या सांगण्यावरून मुलाने वडिलांना घराबाहेर काढले, एवढ्यावरच थांबला नाही तर बहिणींवरही जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणामुळे नात्यांची अब्रू वेशीवर टांगली गेली असून गावात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दगडू माळी यांची मुलगी उज्वला या १५ सप्टेंबर रोजी आईच्या श्राद्ध कार्यक्रमासाठी नैवेद्य देण्यासाठी घरी गेल्या होत्या. त्यावेळी दगडू माळी यांचा मुलगा जोतिराम माळी याने वडिलांवर काठीने हल्ला केला. बहिण उज्वला याही त्यात गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे, वडिल आणि बहिणी जखमी होऊन पोलीस ठाण्यात तक्रार करण्याआधीच आरोपी मुलगा जोतिराम माळी याने स्वतःच पोलिसात खोटी तक्रार दाखल केली. त्यामध्ये त्याने वडील दगडू माळी आणि बहिण उज्वला यांच्यावरच गंभीर आरोप लावले.
या प्रकरणी पीडित बहिण उज्वला यांनी आपली आपबीती सांगताना म्हटले की,
“मी गेल्या चार वर्षांपासून वडिलांना सांभाळते. परंतु, भाऊ जोतिराम आणि वहिनी अनिता यांनी माझ्या वडिलांना घरातून हाकलून दिलं. आईच्या श्राद्धासाठी मी दर्शनाला जात असताना त्यांनी आम्हाला घरात शिरू दिलं नाही आणि आमच्यावर प्राणघातक हल्ला केला. तो सतत आम्हाला त्रास देतो, जीवे मारण्याच्या धमक्या देतो, तरीसुद्धा तो मोकाट फिरतोय. आम्ही मात्र न्यायासाठी पोलीस ठाण्यापासून कोर्टापर्यंत भटकंती करतोय.”
या वादामागे मूळ कारण म्हणजे संपत्तीचा वाद असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दगडू माळी यांचे सर्व हक्क स्वतःकडे घेण्यासाठी जोतिरामने घरावर कब्जा केला. त्यांना घराबाहेर काढल्यानंतर बहिणींनाही यातून त्रास देण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर खोट्या तक्रारींचा आधार घेऊन स्वतःची निर्दोषता सिद्ध करण्याचाही प्रयत्न आरोपी मुलाकडून केला जात आहे.
कायद्यानुसार मुलाने आई-वडिलांचा सांभाळ करणे बंधनकारक आहे. तरीदेखील या प्रकरणात त्या कायद्याची जाहीरपणे पायमल्ली झाल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित बहिणींनी केली आहे. याशिवाय, महिला आयोगानेही यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
आटपाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. संपत्तीच्या हव्यासाने नाती कशी तुटतात याचं धक्कादायक चित्र या घटनेतून उघडकीस आलं आहे. गावात या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
संपत्तीच्या मोहाने आपल्या आई-वडिलांना घराबाहेर काढणे ही केवळ नात्यांची अब्रू घालवणारी बाब नाही तर संपूर्ण समाजाला काळी छाया दाखवणारी घटना आहे. सांगलीतील ही घटना हे नात्यांच्या अधःपतनाचं जिवंत उदाहरण ठरत आहे.