
माणदेश एक्सप्रेस/मिरज : मिरजेत भारतनगर येथे बारावीतील विद्यार्थाने परीक्षेपूर्वी आदल्या रात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. परीक्षेच्या तणावामुळे प्रथमेश बाळासाहेब बिराजदार या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.
भारतनगर गवळी प्लॉट येथील प्रथमेश बिराजदार हा खासगी अकॅडमीत बारावी शिकत होता. काल, सोमवारी सायंकाळी परीक्षेत पेपर कसा सोडवायचा याचे अकॅडमीतून लेक्चर ऐकून तो रात्री आठ वाजता घरी परत आला. घरी आल्यानंतर बहिणीसोबत चेष्टा मस्करी करून तो अभ्यासासाठी वरच्या खोलीत गेला. खोलीत त्याने अँगलला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
रात्री नऊ वाजता प्रथमेशला जेवायला बोलवण्यास गेल्यानंतर त्याने खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. प्रथमेश याचे वडील मिरजेत कृषी विभागात सहाय्यक आहेत. प्रथमेश हा अभ्यासातही चांगला होता. मात्र त्याने आत्महत्या का केली याबाबत गूढ निर्माण झाले आहे. प्रथमेशने टोकाचे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त होत होती. याबाबत गांधी चौक पोलिसात नोंद झाली आहे.