
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|कवठेमहांकाळ : येथील एस.टी. आगार व्यवस्थापक अमर निकम यांना कार्यालयातच घुसून तीन ते चार जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणामुळे कवठेमहांकाळ एस.टी. डेपोमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी डेपोतील कंडक्टर तानाजी दामू यमगर याच्या अरेरावी व शिवीगाळीच्या वर्तणुकीविरोधात क्लार्क अनिता प्रमोद जगताप यांनी आगारप्रमुख अमर निकम यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून व्यवस्थापक निकम यांनी वाहक तानाजी यमगर याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
या कारवाईचा राग मनात धरून तानाजी यमगर याने दोन ते तीन महिलांसह थेट अमर निकम यांच्या केबिनमध्ये धडक मारली. निलंबनाचा जाब विचारत वादावादी सुरू झाली आणि यमगर व महिलांनी मिळून निकम यांना बेदम मारहाण केली. महिलांनी केबिनमधील वस्तू उचलून फेकत त्यांच्यावर तुफान हल्ला चढवला. निकम यांनी वारंवार “मला मारू नका” अशी विनवणी केली, पण हल्लेखोरांनी त्यांच्या विनवणीकडे दुर्लक्ष केले.
या घटनेची माहिती मिळताच डेपो परिसरात खळबळ उडाली. मारहाणीची नोंद रात्री उशिरापर्यंत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली नव्हती. दरम्यान, “माझ्याकडून कोणतीही अरेरावी वा वाईट बोलणे झाले नाही. फक्त चुकीच्या कृत्यामुळे निलंबनाची कारवाई केली होती. त्याचा राग धरून हा हल्ला झाला. हा दहशत पसरविण्याचा प्रकार आहे,” असे अमर निकम यांनी सांगितले.