
माणदेश एक्सप्रेस न्यूज | स्पोर्ट्स डेस्क
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेतील मँचेस्टरचा सामना ड्रॉ झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी सामना संपवण्यासाठी भारतीय फलंदाजांवर हस्तांदोलनाचा दबाव टाकल्याचा आरोप होत असताना, अखेर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यावर मौन सोडले आहे.
तेंडुलकरने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन का करावं? त्यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना विश्रांती का द्यावी? जर इंग्लंडला हॅरी ब्रूकसारख्या भागवेगळी गोलंदाजीत उतरायचं असेल, तर ती त्यांच्या कर्णधाराची निवड आहे – भारताची जबाबदारी नाही.”
ही घटना चौथ्या कसोटीत घडली होती. भारताच्या रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शेवटपर्यंत झुंज देत सामना ड्रॉ करण्यासाठी निर्णायक भूमिका बजावली. इंग्लंडच्या खेळाडूंनी मैदानात त्यांच्याशी हस्तांदोलन करत सामना संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय खेळाडूंनी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित ठेवत दोघांचे शतक पूर्ण होईपर्यंत सामना खेळत राहण्याचा निर्णय घेतला.
सचिनने यावर भाष्य करताना रेडिटवरील एका चर्चासत्रात म्हटले, “जर वॉशिंग्टन आणि जडेजा क्रीजवर आल्यावर लगेच बाद झाले असते, तर सामना भारत गमावला असता. त्यांनी शतक झळकावत केवळ वैयक्तिक यशासाठी नव्हे, तर टीमसाठी सामना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. हीच खरी क्रीडा भावना आहे.”
या मालिकेत पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. भारताने दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. तिसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला, मात्र चौथ्या आणि पाचव्या सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त झुंज देत मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली.
ही मालिका भारताच्या संयम आणि संघर्षाची प्रतीक ठरली. मँचेस्टरमधील वादामुळे चर्चा वाढली असली, तरी सचिनच्या विधानामुळे भारतीय खेळाडूंना मोठा नैतिक पाठिंबा मिळाला आहे.