आटपाडी तालुक्याच्या सुपुत्राची अर्जुन पुरस्काराला गवसणी

0
979

माणदेश एक्सप्रेस/आटपाडी : शारीरिक कमकुवतपणालाच आपली ताकद बनवत स्वतःला क्रीडाविश्वात सिद्ध करणाऱ्या करगणी (ता. आटपाडी) गावचा सुपुत्र व पॅरा ऑलिम्पिकवीर सचिन खिलारी याला क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला.

 

सचिन खिलारी याने पॅरिस येथील पॅरा ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक एफ ४६ प्रकारात रौप्यपदक पटकावत देशाचे लक्ष वेधले होते. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सचिनला गुरुवारी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. सचिनला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यामुळे तालुक्यात आनंदोत्सव साजरा होत आहे.

 

शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिवंगत ॲड. सर्जेराव खिलारी यांचा सचिन हा मुलगा आहे. अवघ्या नवव्या वर्षी सचिन सायकल चालवताना पडला. त्यामध्ये त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला. मात्र काही दिवसात ‘गँगरीन’ झाले. तो जीवघेण्या संकटातून वाचला. पण, त्याच्या हाताच्या हालचालींवर कायमस्वरूपी अपंगत्व आले.

 

बालपणात झालेला मोठा आघात सचिनने मोठ्या धैर्याने पचविला.शारीरिक मर्यादेचे भांडवल न करता त्याने थेट मोठे मैदान गाजवण्याचा निर्धार केला. अथक परिश्रम आणि स्वप्नपूर्तीच्या निरंतर ध्यासातून सचिन सर्जेराव खिलारी हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले. इंजिनिअर असलेल्या सचिनने देशवासीयांची मान गर्वाने उंचावली आहे.

ॲथलेटिक्समध्येच करिअर करण्याचा निश्चय करत प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली थाळीफेक व भालाफेकला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत सचिन खिलारीने २०२३ च्या जागतिक पॅरा अजिंक्यपद स्पर्धेत गोळाफेकमधील एफ ४६ गटात १६.२१ मीटर गोळा फेकत सुवर्णपदक पटकावले. २०२४ च्या जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले. २०२२ मध्ये आशियाई पॅरा स्पर्धेतील सुवर्णपदकही त्याच्या नावावर आहे. क्रीडाक्षेत्रातील सचिनच्या या दैदीप्यमान कामागिरीने त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सचिन खिलारी याने २०२४ च्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये गोळाफेक क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकावले. त्याच्या कामगिरीमुळे भारताला ४० वर्षांनंतर पदक मिळाले.