RSS वर बंदीच्या मागणीवरून भाजप–काँग्रेस आमनेसामने

0
114

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई : 

कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालण्याची मागणी करत राज्यात राजकीय वादळ उठलं आहे. कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून सरकारी जागांवर RSS च्या शाखा, बैठकांसह सर्व उपक्रमांवर पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.

या मागणीने राजकीय वातावरण तापले असून भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत खरगे यांना थेट टोला लगावला.


“कर्नाटकचे प्रियांक खरगे हे फक्त प्रसिद्धीसाठी असल्या गोष्टी करतात. ते वडिलांच्या (मल्लिकार्जुन खरगे) भरवश्यावर राजकारण करत आहेत. याआधी अनेक वेळा RSS वर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला. इंदिरा गांधींनी बंदी घातल्याचं उदाहरण सर्वांनाच माहित आहे. त्याचा शेवट त्यांच्या सत्तेच्या पायउतार होण्यात झाला,” असं फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले,

“संघ एक सांस्कृतिक आणि देशभक्त संघटना आहे. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित, मूल्याधिष्ठित कार्य करणारी ही संस्था आहे. अशा संस्थेबद्दल असं बोलणं म्हणजे स्वतःचं अज्ञान दाखवणं आहे. प्रसिद्धीसाठी असं पत्र देणाऱ्यांकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही.”


प्रियांक खरगे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की,

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकारी शाळा, क्रीडांगणे आणि मंदिरांमध्ये शाखा घेत आहे. या शाखांद्वारे ते मुलं आणि तरुणांमध्ये फूट पाडणारे विचार पसरवत आहेत. RSS ही संघटना संविधानाच्या तत्वांविरुद्ध काम करत असून भारताची एकता आणि अखंडता धोक्यात आणते.”

खरगे यांनी RSS ची विचारसरणी “धोकादायक” असल्याचे सांगत म्हटलं —

“जर RSS चे विचार इतके महान असतील, तर ते त्यांच्या घरात का अमलात आणत नाहीत? मनुस्मृतीच्या बाजूने उभे राहून संविधानाला विरोध करणारा RSSच नव्हता का?”


खरगे यांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया देत म्हटलं की,

“काँग्रेस RSS विरुद्ध कारवाईच्या नावाखाली लोकांचे लक्ष विचलित करत आहे. खरं कारण म्हणजे काँग्रेसमधील अंतर्गत सत्तासंघर्ष आणि मुख्यमंत्रीपदासाठीचा गोंधळ लपवणे.”


RSS वर बंदीचा विषय भारतीय राजकारणात नवा नाही.

  • 1948 मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघावर बंदी घालण्यात आली होती, पण नंतर ती उठवण्यात आली.

  • 1975 च्या आणीबाणीच्या काळात पुन्हा बंदी आली, पण त्यानंतर संघ अधिक प्रभावी बनला.

  • काँग्रेस नेत्यांकडून वेळोवेळी संघावर बंदीची मागणी होत आली आहे, मात्र प्रत्येकवेळी ती फोल ठरली आहे.


कर्नाटकात उभा राहिलेला RSS बंदीचा वाद आता महाराष्ट्रातही पोहोचला आहे. फडणवीसांनी दिलेली “ढुंकूनही पाहत नाही” ही प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय बनली आहे. RSS विरोधात काँग्रेसची भूमिका आणि भाजपची बचावात्मक आक्रमक भूमिका पाहता, हा वाद अजून वाढण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here