
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या पोलिसांना माफ करण्याचं आवाहन केले आहे. धस यांच्या या मागणीचा आरपीआयचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी समाचार घेतला असून, असे असेल तर, सुरेश धस यांना आरपीआयचे कार्यकते राज्यात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला.
सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मोठं विधान केलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणातील आरोपी पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा, असं आवाहन सुरेश धस यांनी केलं आहे. त्यावर राजेंद्र खरात यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुम्ही संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना असंच मोठ्या मनाने माफ करणार आहात का? सोमनाथच्या जागी तुमचा मुलगा असता तर असंच माफ केलं असतं का? असा सवाल राजेंद्र खरात यांनी सुरेश धस यांना केला आहे.
सूर्यवंशी कुटुंब कधीच दोषी पोलिसांना माफ करणार नाही. तुम्ही पोलिसांची बाजू घेऊ नका. आमच्यावर काय दु:खाचा डोंगर कोसळला आम्हाला माहित आहे. सुरेश धस पूर्णपणे चुकीचे बोलले आहेत. याचे गुन्हे माफ करा, त्याचे गुन्हे माफ करा हे सांगण्यासाठीच जनतेने यांना निवडून दिले का? गुन्हेगारांना असं माफ करत गेलं तर गुन्हेगारीचं प्रमाण वाढेल आणि गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं तर त्याला सरकार जबाबदार असेल काय? सुरेश धस यांचा स्वतःचा मुलगा असता तर त्यांनी पोलिसांना माफ केले असते का? संतोष देशमुख यांच्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी धस यांनी एवढे परिश्रम घेतले आणि सोमनाथ सूर्यवंशी बाबत त्यांची वेगळी भूमिका कशी काय? हे दलालीचे धंदे बंद करा. चार पोलीस निलंबित केल्याने आंबेडकरी समाज समाधानी नाहीत, आज निलंबित करतील, उद्या कामावर घेतील? त्यामुळे सुरेश धस तुम्ही तातडीने माफी माग नाहीतर तुम्हाला आरपीआयचे कार्यकर्ते राज्यात फिरू देणार नसल्याचे राजेंद्र खरात म्हणाले.