
माणदेश एक्सप्रेस न्युज | बारामती :
महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीच्या झळा सोसत असताना, राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीवरून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी या मदतीवर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सरकारकडून नुकतेच पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रत्येकी ७००० रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र या घोषणेवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, “ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची सरळ चेष्टा आहे. सरकार शेतकऱ्यांच्या वेदना, त्यांचे खरे प्रश्न समजून घेण्याऐवजी केवळ दिखाऊ घोषणा करत आहे.”
त्यांनी स्पष्ट शब्दांत सरकारला इशारा दिला की, “शेतकऱ्यांशी अन्याय झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही सोडणार नाही, सरकारकडून या निर्णयाबद्दल जाब विचारणारच.”
राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या हातची पिकं वाया गेली आहेत. शेतीचे नुकसान लाखो रुपयांच्या घरात असताना सरकारकडून मिळणारे फक्त ७००० रुपये हे शेतकऱ्यांसाठी अपुरेच ठरत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.
रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. विरोधकांनीही सरकारच्या मदतधोरणावर सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, सरकारकडून ही मदत ‘तात्पुरता दिलासा’ असल्याचे सांगण्यात येत असले तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षा यापेक्षा खूपच मोठ्या आहेत.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरी गरज आहे ती तत्काळ आणि पुरेशी आर्थिक मदत, तसेच कर्जमाफी, वीजबिल सवलती आणि विमा दाव्यांच्या तातडीच्या सेटलमेंटची. केवळ घोषणांनी शेतकऱ्यांची पोटं भरत नाहीत, हे रोहित पवार यांच्या टीकेतून प्रकर्षाने जाणवले.
रोहित पवार यांच्या या टीकेमुळे सरकारवर दबाव वाढणार हे निश्चित आहे. पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी केवळ आश्वासनांपेक्षा ठोस निर्णय अपेक्षित असल्याचे विरोधक सातत्याने सांगत आहेत.