रात्रपाळीत काम केल्याने लठ्ठपणा, मधुमेह होण्याचा धोका बळावत असून यामुळे हृदयविकार आणि कर्करोग होण्याची शक्यता असल्याचा इशारा संशोधकांनी दिला. अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट विद्यापीठातील संशोधकांनी शरीर केवळ मेंदूतील जैविक घडय़ाळानुसार काम करीत नसून यकृत, आतडे, स्वादुपिंड हे त्यांच्या स्वतंत्र जैविक घडय़ाळानुसार काम करत असल्याचे मांडले.
चयापचयासाठी कारणीभूत असलेल्या अवयवांमधील जैविक घडय़ाळामध्ये कामाच्या वेळेनुसार गंभीर आणि जलद बदल होत असल्याबाबत आम्ही अनभिज्ञ होतो, असे वॉशिंग्टन स्टेट विद्यापीठाच्या हान्स वॅन डोंगेन यांनी सांगितले. रात्रपाळीत काम करणाऱ्या चाकरमान्यांच्या शरीरातील काही जैविक संकेत दिवस असल्याचे सांगते, तर काही संकेत रात्र असल्याचे सांगते. त्यामुळे चयापचयाच्या प्रक्रियेत व्यत्यय येतात.
रात्रपाळीत काम करण्याचा आणि मूत्रपिंडाच्या रोगाचा संबंध असल्याचा निर्वाळा देणारा आमच्या मते हा पहिलाच अभ्यास असल्याचे वॉशिंग्टन स्टेट विद्यापीठाचे प्राध्यापक शोभम गद्दिमीधी यांनी सांगितले. या अभ्यासाचा परिणाम मूत्रपिंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, त्वचा कर्करोग या प्रकारच्या आजारांच्या अभ्यासावरदेखील होतो. रात्रपाळीचे काम आणि त्यामुळे कर्मचाऱ्याच्या मानसिकतेत होणारा बदल याबाबत अधिक अभ्यास करणे गरजेचे असल्याचे संशोधकांनी म्हटले. या अभ्यासासाठी १४ निरोगी लोकांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले होते. रात्रपाळीत काम करणाऱ्या चाकरमान्यांच्या चयापचयाच्या प्रक्रियेमध्ये होणाऱ्या बदलांमुळे पेशीय प्रक्रियांमध्ये बदल होतो. ज्यामुळे कर्करोग विकसित होत असावा असा संशोधकांचा अनुमान आहे. बदलणाऱ्या पेशीय प्रक्रियांविषयी अधिक माहिती मिळाल्यास कर्करोगाला आळा घालण्यास मदत होऊ शकते, असे संशोधकांनी म्हटले.