ऐन दिवाळीत कलाविश्वावर शोककळा : प्रसिद्ध अभिनेता आणि गायकाच हृदयविकाराने निधन

0
134

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई–दिल्ली :
दिवाळीच्या उत्साहात संपूर्ण देश न्हाऊन निघाला असताना, कलाविश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता, गायक आणि संगीतकार ऋषभ टंडन यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. ही घटना आज (बुधवार, 22 ऑक्टोबर) दिल्लीत घडली. ऐन दिवाळीच्या सणात, आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी ऋषभ दिल्लीला गेला होता. परंतु नियतीने अचानक घाला घातला आणि कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला.

ऋषभ मुंबईत आपल्या पत्नीसोबत राहत होता. दिवाळीनिमित्त तो आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी दिल्लीला गेला होता. त्याच्या टीममधील एका माजी सदस्यानेच या दुःखद वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे.


ऋषभ टंडन हा अभिनय आणि संगीत या दोन्ही क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणारा कलाकार होता. त्याच्या शांत, नम्र स्वभावामुळे तो चाहत्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण करून गेला.
2008 मध्ये टी-सीरिजच्या ‘फिर से वही’ या म्युझिक अल्बममधून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्याने ‘फकीर – लिव्हिंग लिमिटलेस’ आणि ‘रशना – द रे ऑफ लाइट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

गायक म्हणूनही त्याने अनेक लोकप्रिय गाणी दिली –

  • 🎵 ‘आशिकी’

  • 🎵 ‘चांद दू’

  • 🎵 ‘धू धू कर के’

  • 🎵 ‘फकीर की जुबानी’

ही सर्व गाणी संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय ठरली आणि त्याला ओळख मिळवून दिली.


ऋषभ हा केवळ कलाकार नव्हता, तर तो प्राण्यांचा जिवाभावाचा मित्र होता. त्याच्या मुंबईतील घरात त्याने मांजरी, कुत्रे आणि पक्षी पाळले होते. त्यांना तो आपल्या कुटुंबाचा भाग मानत असे.
त्याचं संगीत आणि त्याचं आयुष्य दोन्हीही संवेदनशीलतेने ओतप्रोत भरलेलं होतं. त्याची काही नवीन गाणी सध्या प्रॉडक्शनच्या अंतिम टप्प्यात होती आणि येत्या काळात ती प्रदर्शित होणार होती. पण त्याच्या अकाली निधनाने ही सर्व स्वप्नं अधुरी राहिली.


ऋषभ टंडनचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री सारा खानसोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं. सारासोबतचा एक फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र नंतर साराने त्या अफवा फेटाळल्या.

यानंतर ऋषभने रशियाच्या ओलेसिया नेडोबेगोवा (Olesya Nedobegova) हिच्याशी विवाह केला. ओलेसियाने उझबेकिस्तानमधील ऋषभच्या एका डिजिटल प्रोजेक्टसाठी लाइन प्रोड्युसर म्हणून काम केलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि 2023 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. यावर्षी त्यांनी करवाचौथही साजरा केला होता, त्याचे फोटो त्याने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.


ऋषभच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली. अनेक सहकारी कलाकार, दिग्दर्शक आणि संगीतकारांनी त्याला श्रद्धांजली वाहिली.
त्याचं नाव शांतता, संगीत आणि संवेदनशीलतेचं प्रतीक म्हणून ओळखलं जायचं. त्याच्या जाण्यानं केवळ त्याच्या कुटुंबीयांचं नव्हे, तर संपूर्ण कलाक्षेत्राचंही अपरिमित नुकसान झालं आहे.


ऋषभ टंडनचं निधन हे भारतीय कलाविश्वासाठी एक मोठं आणि भरून न निघणारं नुकसान आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात आलेल्या या दु:खद घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टी अवाक झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here