भारतीय उपकर्णधाराला मोठा धक्का, कसोटीत खेळता येणार नाही पंतला

0
108

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | नवी दिल्ली –

भारतीय क्रिकेट संघासाठी आणि चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आशिया कप 2025 मध्ये (Asia Cup 2025) दुखापतीमुळे बाहेर राहिलेला टीम इंडियाचा उपकर्णधार व स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा आगामी वेस्टइंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही बाद झाला आहे.


इंग्लंड दौऱ्यात चौथ्या कसोटीत क्रिस वोक्सच्या चेंडूवर फलंदाजी करताना पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले. त्यानंतरपासूनच तो खेळापासून दूर आहे. आशिया कपमध्येही तो सहभागी होऊ शकला नाही. अद्याप तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला नसल्याने 2 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वेस्टइंडीज मालिकेत त्याचा समावेश होणार नाही, अशी माहिती ESPN-Crickinfo ने दिली आहे.


BCCI च्या वैद्यकीय पथकाने अद्याप पंतच्या फिटनेसला हिरवा कंदील दिलेला नाही. त्याच्या दुखापतीत सुधारणा होत असली तरी कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक तंदुरुस्ती त्याच्याकडे नाही. त्यामुळे निवड समितीने त्याला या मालिकेसाठी निवडण्याचा धोका पत्करलेला नाही.


पंतच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापनासमोर यष्टीरक्षक व मधल्या फळीतला फलंदाज निवडण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये केएल राहुल व संजू सॅमसन हे प्रमुख दावेदार आहेत. उद्या (24 सप्टेंबर) अजित अगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती भारतीय संघाची अधिकृत घोषणा करणार आहे. त्याआधीच पंत संघात नसल्याचे संकेत मिळाले आहेत.


वेस्टइंडीज मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. येथे वनडे आणि टी-20 सामने होणार आहेत. पंत या दौऱ्यापूर्वी वैद्यकीय चाचणीत पास होईल अशी अपेक्षा आहे. जर तो चाचणी उत्तीर्ण झाला, तर त्याचे पुनरागमन या मालिकेत होऊ शकते.


केवळ 27 वर्षांचा असलेला ऋषभ पंत हा सध्या भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे आणि यष्टीमागच्या कौशल्यामुळे तो संघासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. पण सातत्याने येणाऱ्या दुखापतींमुळे त्याचे करिअर अडखळत असल्याचे चित्र आहे.

पंतच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला वेस्टइंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. आता चाहत्यांच्या नजरा त्याच्या फिटनेस चाचणीकडे लागल्या आहेत. तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात परततो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here