
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कलाकारांची जोडी – सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान – नव्या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी मराठी वाहिनीवर लवकरच प्रसारित होणाऱ्या या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला असून, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ असे या मालिकेचे नाव असून, यात तेजश्री ‘स्वानंदी’ तर सुबोध ‘समर’ ही प्रमुख पात्रं साकारणार आहेत. नात्यांतील गुंतागुंत, प्रेम आणि जबाबदाऱ्या यांची गोफ विणणारी ही मालिका असल्याचा संकेत प्रोमोमधून मिळतो.
तेजश्री प्रधानने यापूर्वी ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अगंबाई सासूबाई’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकांमधून आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘प्रेमाची गोष्ट’मधून तिने अचानक एक्झिट घेतल्याने तिच्या चाहत्यांमध्ये नाराजी होती. मात्र आता तिच्या पुनरागमनाने चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.
दुसरीकडे, सुबोध भावेचा ‘तुला पाहते रे’ हा मालिकेतील अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. त्यामुळे त्याचेही पुनरागमन चर्चेचा विषय ठरत आहे. या दोघांनी यापूर्वी ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटात एकत्र काम केले होते, ज्यास प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
या मालिकेच्या प्रोमोला उत्साही प्रतिसाद मिळत असला तरी काही प्रेक्षकांनी कथानकाविषयी शंका उपस्थित केल्या आहेत. मालिकेचे कथानक एका हिंदी मालिकेच्या रिमेकप्रमाणे वाटत असल्याने काही नेटकऱ्यांनी ‘ओरिजनल कल्पनांची उणीव’ असल्याची नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
तरीही, सुबोध-तेजश्री या लोकप्रिय कलाकारांची जोडी आणि झी मराठीचा मजबूत प्रेक्षकवर्ग पाहता, ही मालिका मोठा गाजावाजा करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
View this post on Instagram