
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याचा इशारा; सर्व जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार
माणदेश एक्स्प्रेस न्यूज |नागपूर : भारतीय हवामान खात्याने संपूर्ण महाराष्ट्रासाठी उद्या, रविवार (२५ मे) रोजी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात २८ मेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने सांगितले की, दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा व दक्षिण छत्तीसगडपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. दरम्यान, केरळमध्ये शनिवारीच मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. बंगालच्या उपसागरातही पावसाळ्याची शाखा सक्रीय झाली असून, पश्चिम बंगालमध्येही लवकरच पावसाचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.
राज्यातील जिल्ह्यानिहाय पावसाचा अंदाज पुढीलप्रमाणे:
मुंबई, ठाणे, पालघर: हलका ते मध्यम पाऊस
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग: मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर: मध्यम ते जोरदार पाऊस, घाटमाथ्यावर विशेषतः पावसाचा जोर
सांगली, सोलापूर: हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव: वादळी वाऱ्यांसह पाऊस
अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, भंडारा, बुलढाणा: मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
धुळे, नंदुरबार, जळगाव: हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस
हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित स्थळी थांबावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. राज्यातील सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून, रविवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.