पाचगणीत आढळले दुर्मीळ पांढरे सांबर

0
983

माणदेश एक्सप्रेस/सातारा : पाचगणी परिसरात शुक्रवारी सकाळी दुर्मीळ प्रजातीचे पांढरे शुभ्र सांबर आढळल्याने वन्यप्रेमी व निसर्गप्रेमींच्या भुवया उंचावल्या. सिडनी पॉइंटच्या पायथ्याशी असलेल्या तळेमाळ परिसरापासून काही अंतरावर हे सांबर आढळून आले. त्याला पाहणे आणि छायाचित्रात टिपण्यासाठी उपस्थितांची धांदल उडाली. कोणताही प्राणी किंवा पक्ष्याच्या शरिरात त्याचे रंगकण ठरवणाऱ्या मिलानिन नावाचा एक घटकाचा जन्मजात अभाव राहिल्यास त्या पशू-पक्ष्यांमध्ये रंगात हे असे बदल घडत ते केवळ शुभ्रधवल दिसू लागतात, असे मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. अशा जीवांना ‘अल्बिनो’ प्रकारातील म्हणून ओळखले जाते.

 

काही दिवसांपासून वाई पाचगणी महाबळेश्वर परिसरातील डोंगररांगांमध्ये वणव्यांचे सत्र सुरू आहे. जंगल भागात खाण्याची वाणवा आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांनी लोकवस्तीकडे धाव घेतली आहे. सध्या हा सर्व परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प लगतचा आहे. त्यामुळे या भागामध्ये उन्हाळ्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यामुळे अन्नपाण्याच्या शोधात हे वन्य प्राणी लोकवस्तीकडे वळत आहेत. यातूनच हे दुर्मीळ पांढरे सांबर पाचगणी परिसरात आले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

 

पांढऱ्या रंगातील सांबर वन्यजीवांमधील अभ्यासाचा विषय आहे. असा जीव आपल्या सह्याद्रीच्या वनसृष्टीत असणे हे एकप्रकारचे वैविध्य आहे. हा प्राणी कायम एका जागी वास्तव्य करत किंवा स्थिर होत नसल्याने त्याचे पुन्हा दर्शन घडेल किंवा शोध घेणे शक्य होईल असेही नाही. परंतु तो कुणाला दिसल्यास त्याला मानवी वावराचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जावी.

 

कोणताही प्राणी किंवा पक्ष्याच्या शरिरात मिलानिन नावाचा एक घटक असतो. हा घटक त्या जीवाच्या रंगकणांशी संबंधित असून त्यानुसार त्याला निसर्गाने बहाल केलेली रंगसंगती ठरत असते. ज्या जीवांमध्ये या घटकाचा जन्मजात अभाव असतो तिथे त्यांच्यात कुठलाही रंग न येता सर्व शरीर पांढऱ्या रंगात दिसू लागते. पाचगणीला दिसलेले पांढरे सांबर हे नवीन जात नसून, त्याच्या शरिरातील या रंगकणांचा अभाव आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here