
माणदेश एक्सप्रेस न्यूज | दहिवडी :
माण तालुक्यातील राणंद गावच्या हद्दीतील हेळकर पठारावर बुधवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. ७५ वर्षीय वृद्ध महिला हिराबाई दाजी मोटे यांचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. प्राथमिक तपासातून हा खून जमिनीच्या वादातून झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेची मुलगी संगीता खाशाबा कोळेकर सोमवारी (दि. ८) शेतातील कामावरून घरी आली असता आई घरात न सापडल्याने तिने भावाला – दत्तात्रय मोटे यांना कळवले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत शोध सुरू ठेवूनही हिराबाई सापडल्या नाहीत. दुसऱ्या दिवशीही गावात व शिवारात शोध घेतला, मात्र काही सुगावा लागला नाही.
बुधवारी सकाळी साडेदहा वाजता संगीता कोळेकर व तिचा मुलगा संतोष यांनी पुन्हा शोध सुरू केला. त्यावेळी हेळकर पठारावरील रानात हिराबाई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्यांच्या डोक्यात मोठ्या दगडाने वार करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
घटनास्थळावर महिलेचा मृतदेह पाहताच गावकऱ्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. एकीकडे वयोवृद्ध महिलेला अशा पद्धतीने ठार मारण्यात आल्यामुळे गावात संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना समजताच मोठ्या प्रमाणावर गावकरी घटनास्थळी धावले.
या प्रकरणाची माहिती गावचे पोलिस पाटील अप्पासाहेब गायकवाड यांनी तातडीने दहिवडी पोलिस ठाण्याला दिली. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, शिखर शिंगणापूरचे पोलिस उपनिरीक्षक मोहन हांगे व नंदकुमार खाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. प्राथमिक चौकशीत हा खून जमिनीच्या वादातून झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मृतक हिराबाई मोटे यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली व सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुटुंबीय व नातेवाईक शोकाकुल अवस्थेत आहेत. दहिवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या खून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.