
माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) सांगली व सातारा जिल्हा टेलिफोन सल्लागार समिती सदस्यपदी झरे येथील रमेश (बंडूशेठ) कातुरे यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
बीएसएनएल टेलिफोन सल्लागार समिती ही दूरसंचार सेवांबाबत मार्गदर्शन, सूचना व सुधारणा यासाठी कार्यरत असते. समितीत निवड होणे ही एक प्रतिष्ठेची बाब असून, यामुळे स्थानिक ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण व सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी थेट मार्ग मोकळा होतो. रमेश कातुरे पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे व सर्वसमावेशक दृष्टीकोनामुळे त्यांची ही निवड झाल्याचे मानले जात आहे.
यावेळी दत्तात्रय पाटील, मनोज नांगरे, राजेश नांगरे, रामदास सूर्यवंशी, आप्पासो माळी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना तानाजीराव पाटील म्हणाले, “रमेश कातुरे यांच्या निवडीमुळे सांगली आणि सातारा जिल्ह्यातील बीएसएनएल ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी एक सक्षम प्रतिनिधी मिळाला आहे. त्यांच्या माध्यमातून सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, असा विश्वास आहे.