
माणदेश एक्सप्रेस न्युज : अयोध्या : राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी लखनऊ पीजीआय येथे निधन झाले. ३ फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर आचार्य सत्येंद्र दास यांना गंभीर अवस्थेत लखनौ पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. (Acharya Satyendra)
आचार्य सत्येंद्र दास यांचे आज सकाळी ८ वाजता लखनऊच्या पीजीआयमध्ये निधन झाले. त्यांचे पार्थिव पीजीआयहून अयोध्येत आणले जात आहे. त्यांचे शिष्य त्यांचे पार्थिव घेऊन अयोध्येला रवाना झाले आहेत. उद्या (१३ फेब्रुवारी) अयोध्येत शरयू नदीच्या काठावर त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. (Acharya Satyendra)
फेब्रुवारी १९९२ मध्ये जेव्हा वादग्रस्त जमिनीमुळे रामजन्मभूमीची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे सोपवण्यात आली, तेव्हा जुने पुजारी महंत लालदास यांना काढून टाकण्याबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर १ मार्च १९९२ रोजी सत्येंद्र दास यांची नियुक्ती भाजप खासदार विनय कटियार, विश्व हिंदू परिषद नेते आणि तत्कालीन विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांच्या संमतीने करण्यात आली होती. (Acharya Satyendra)
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महान रामभक्त, श्री रामजन्मभूमी मंदिर, अयोध्या धामचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र कुमार दास महाराज यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. सामाजिक आणि आध्यात्मिक जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
राम मंदिर भवन निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्त आणि अयोध्या राजघराण्याचे नेते विमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा, डॉ. अनिल मिश्रा आणि गोपाल जी यांनीही सत्येंद्र दास यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.