
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ मधील अखेरच्या सामन्यात विजय मिळवत आपल्या मोहिमेचा चांगला शेवट केला. राजस्थानने २ षटकं बाकी ठेवत ६ विकेट्सने चेन्नई सुपर किंग्स संघावर विजय मिळवला. यासह राजस्थान रॉयल्सने यशस्वीपणे विजयाचं लक्ष्य दुसऱ्यांदा पार केले. ध्रुव जुरेलने आपल्या षटकारांच्या जोरावर संघाला अखेरीस विजय मिळवून दिला आणि आपली फिनिशरची भूमिका चोख बजावली.
राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ६ विकेट्सने पराभव करून शानदार विजय मिळवला. या हंगामात राजस्थानचा हा चौथा विजय आहे. हे दोन्ही संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत आणि गुणतालिकेत तळाशी आहेत. त्यामुळे या सामन्याचा निकाल प्लेऑफच्या शर्यतीवर परिणाम करणार नाही. पण गुणतालिकेत दोन्ही संघाच्या प्रतिष्ठेचा मात्र प्रश्न होता.
चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या १८८ धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जैस्वालने १९ चेंडूत ३६ धावा केल्या. ज्यामध्ये ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तर वैभव सूर्यवंशीने संथ सुरूवातीनंतर ३३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५७ धावा करत सामना एकतर्फी केला. दुसरीकडे, कर्णधार संजू सॅमसनने ४१ धावांचे योगदान दिले. त्यानंतर ध्रुव जुरेलने १२ चेंडूत नाबाद ३१ धावा करत राजस्थानला विजय मिळवून दिला.
राजस्थानने संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत चेन्नई संघावर दबाव कायम ठेवला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडला. चेन्नईने फक्त १२ धावांत २ विकेट गमावल्या. यानंतर, आयुष म्हात्रेने वादळी खेळी खेळली आणि पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा केल्या. पण राजस्थानच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केलं.
आयुष म्हात्रेने २० चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह ४३ धावा केल्या. यानंतर, डेवाल्ड ब्रेव्हिसने २५ चेंडूत ४२ धावा केल्या आणि संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. शिवम दुबेनेही ३९ धावा केल्या, ज्यामुळे सीएसके संघ २० षटकांत ८ गडी गमावून १८७ धावा करू शकला.


