मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग, कोकणात रेड अलर्ट; पुढील तीन दिवस हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

0
73

माणदेश एक्सप्रेस न्यूज | ७ ऑगस्ट २०२५

मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागांमध्ये पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. विशेषतः कोकणासाठी रेड आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत बुधवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रुझ, विलेपार्ले यांसारख्या पश्चिम उपनगरांत जोरदार सरी सुरू आहेत. परिणामी रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक १५ मिनिटे उशिराने तर हार्बर मार्गाची वाहतूक १० मिनिटे उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वे मात्र सुरळीत सुरू आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण कोकणात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये रेड व यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने या भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. किनारपट्टी भागांत समुद्र खवळलेला असून, मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा मोठा फटका बसत आहे. बार्शी तालुक्यात बुधवार रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कोरडे पडलेले ओढे तुडुंब भरले. अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह इतर पिकांचं नुकसान झालं आहे. आगळगाव परिसरातील एका युवा शेतकऱ्याचं संपूर्ण पीक वाहून गेल्याने त्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या अनपेक्षित पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून कोकण आणि मुंबई परिसरात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पावसाने पुनरागमन करत वातावरणात गारवा निर्माण केला आहे. यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

🌀 पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज:

  • मुंबई: हलका ते मध्यम पाऊस, ढगाळ वातावरण

  • कोकण: मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस; रेड/यलो अलर्ट

  • सोलापूर/पश्चिम महाराष्ट्र: अचानक पावसाचे धोके; शेतीचे नुकसान

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here