
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई
राज्यात अवकाळी पावसाची मालिका पुढील आठवड्यातही कायम राहणार असून, हवामान विभागाने 20, 21 व 22 मे रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढल्यामुळे महाराष्ट्रात यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने देशभरात वातावरणात बदल झाले असून, उत्तर भारतातही पावसाचा जोर दिसून येत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, आसाम, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या भागांतून येणाऱ्या आर्द्रतेने महाराष्ट्रात वळवाच्या पावसाला सुरुवात झाली आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व वळवाचा पाऊस जोर धरू शकतो, असा अंदाज आहे. हवामान विभागाने यासाठी येलो अलर्ट जारी केला असून काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या हवामान बदलामुळे केरळमध्ये 31 मेच्या आतच मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस लवकर सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.