
अनेक रस्ते पाण्याखाली : माण नदी दुधडी भरून वाहू लागली
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड : माण तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे बहुतांश भागात धुवाधार पाऊस झाल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावचे संपर्क तुटले आहेत. जोरदार पावसामुळे माण नदी दुधडी भरून वाहू लागली असून नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने नदी काठीवरील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा म्हसवड नगरपालिकेने दिला आहे.
मुसळधार पावसामुळे दहिवडी-फलटण रस्ता, शिंगणापूर- फलटण रस्ता, आंधळी-मलवडी रस्ता, मलवडी-कुळकजाई, राजवडी-बिजवडी या रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच शिंगणापूर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर परिसराला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे. दिवसभर शिंगणापूर तसेच परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने ओढे, नाले, तलाव, बंधारे ओसंडून वाहिलेत. तर ऐतिहासिक पुष्करतीर्थ तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली असून तलावाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
माण तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने माण नदी दुधडी भरून वाहत आहे. पावसाचा जोर अजून कायम असल्याने नदीला पूर शक्यता असून माण नदीवरील राजेवाडी तलावात पाणी येत असल्याने याचा मोठा फायदा राजेवाडी परिसरातील तसेच आटपाडी, सांगोला तालुक्यातील शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार आहे.