“वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासणार”; शिवसेनाच्या नेत्याचा इशारा

0
105

माणदेश एक्सप्रेस न्यूज/मुंबई : महाविकास आघाडीत ऑल इज नॉट वेल अशी अवस्था सध्या दिसून येते आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळासाहेब दराडेंनी राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचा अपमान केला आहे त्यामुळे ते नाशिकला आल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासणार आणि त्यांच्यावर दगडफेक करणार असा इशारा दिला आहे.

 

“राहुल गांधी हे जर नाशिकमध्ये आले, तर आम्ही आमच्या ठाकरी शैलीमध्ये, शिवसैनिकांच्या स्टाइलमध्ये त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू आणि त्यांच्या तोंडाला आम्ही काळे फासू” असा थेट इशारा दराडे यांनी दिला. वीर सावरकर यांच्या जयंतीदिनी घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाळा दराडेंची प्रतिक्रिया दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

 

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “राहुल गांधी हे सावरकर यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोललेले नाहीत, अपशब्द वापरलेले नाहीत, इतिहासातील दाखले देऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे सावरकर यांच्याबद्ल जर समिक्षाच करायची असेल तर आतापर्यंत अनेक तज्ञ, इतिहासकार, विचारवंत यांनी सावरकर यांच्याबद्दल काय म्हटले आहे तेही पहावे. भारतीय जनता पक्षाचे नेते अरूण शौरी हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारमध्ये मंत्री होते, त्यांनी सावरकर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात काय म्हटले आहे तेही पहावे व त्यावर बोलावे. एकट्या राहुल गांधींवर टीका करून त्यांना धमक्या देऊन काही साध्य होणार नाही, अशा धमक्यांना काँग्रेस पक्ष भीक घालत नाही, राहुल गांधी यांच्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता भक्कमपणे उभा आहे” असं सपकाळ यांनी म्हटलं आहे.

 

२८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी केली जाते. त्याच दिवशी सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी वीर सावरकरांविषयी विधानं केली होती. यानंतर त्यांच्याविरोधात राज्यातील विविध ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. नाशिकमध्ये मनोज पिंगळे नावाच्या वकिलांनी न्यायालयात धाव घेऊन राहुल गांधींविरोधात याचिका दाखली केली होती. या याचिकेसंदर्भात बोलताना शिवसेना (उद्धव ठाकरे) नाशिक शहर उपप्रमुख बाळा दराडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना इशारा दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here