
माणदेश एक्सप्रेस न्यूज | आरोग्य विशेष :
भारतीयांच्या दैनंदिन आहारात भाताला एक महत्त्वाचं स्थान आहे. पण भात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि डायबिटीसची समस्या उद्भवते, अशी समजूत अनेकांच्या मनात आहे. मात्र हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते भात हा आपला वैरी नसून तो कधी खाल्ला जातो यावर त्याचे फायदे-तोटे अवलंबून असतात. योग्य वेळेवर भात खाल्ल्यास तो वजन नियंत्रणात ठेवतो तसेच शरीराला आवश्यक अशी ऊर्जा देखील पुरवतो.
हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की दुपारी भात खाणं सर्वात चांगलं मानलं जातं. यावेळी शरीराचं मेटाबॉलिझम आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सर्वाधिक सक्रिय असतात. त्यामुळे भात खाल्ल्यानंतर तो त्वरीत एनर्जीमध्ये रूपांतरित होतो. यामुळे ब्लड शुगर लेव्हलमध्ये अचानक वाढ होत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. दुपारी भात खाल्ल्यास शरीराला आवश्यक कार्बोहायड्रेट्स सहज पचतात आणि दिवसभरासाठी ताकद मिळते.
सायंकाळी किंवा रात्री शरीराचा मेटाबॉलिझम तुलनेने मंदावलेला असतो. अशा वेळी कार्बोहायड्रेट-रिच पदार्थ म्हणजेच भात खाल्ल्यास ब्लड शुगर अचानक वाढतो. त्यामुळे शरीरात फॅट स्टोरेज वाढते आणि पचनासंबंधी त्रास निर्माण होऊ शकतो. म्हणूनच नियमितपणे रात्री भात खाल्ल्यास वजन वाढण्याचा धोका जास्त असतो. तज्ज्ञ सांगतात की, ज्यांना लठ्ठपणाची किंवा डायबिटीसची समस्या आहे त्यांनी शक्यतो रात्री भात टाळावा.
डायबिटीस असलेल्या लोकांसाठी भात पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. परंतु भाताची निवड आणि त्याचं सेवन करण्याची पद्धत याकडे लक्ष दिलं पाहिजे.
पांढऱ्या भाताऐवजी ब्राउन, रेड, ब्लॅक किंवा बासमती भात निवडावा.
भात शिजवून थंड करून नंतर परत गरम केल्यास त्यातील रेजिस्टंट स्टार्च वाढतो. हा स्टार्च ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतो.
भात नेहमी डाळी, भाज्या किंवा सॅलडसोबत खाल्ल्यास ब्लड शुगर लेव्हलमध्ये अचानक वाढ होत नाही.
भाजी आधी खाल्ल्याने फायबरचं प्रमाण वाढतं, पचन सुधारतं आणि पोट जास्त वेळ भरलेलं राहतं.
भात हा पूर्णपणे टाळण्यासारखा अन्नपदार्थ नाही. पण तो कधी, किती आणि कसा खाल्ला जातो हे महत्त्वाचं आहे. दुपारी भात खाणं हे आरोग्यासाठी चांगलं तर रात्री भात टाळणं योग्य ठरतं. डायबिटीस रुग्णांनी योग्य प्रकारचा भात निवडून आणि संतुलित प्रमाणात तो खाल्ल्यास त्यांना कोणतीही अडचण येत नाही.