
माणदेश एक्सप्रेस न्यूज | बेळगाव :
गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटून पुण्याकडे परतणाऱ्या कारवर भीषण मृत्यूचे सावट आले. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिपूर फाट्यानजीक सोमवारी (दि. २७) रात्री झालेल्या अपघातात कोथरूड, पुणे येथील अक्षता दिलीप डहाळे (वय २९) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्यासोबत कारमध्ये असलेले पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षता डहाळे या कोथरूड परिसरात स्वतःचे ब्युटी पार्लर चालवत होत्या. त्या आपल्या नातेवाइक व मित्रांसह शुक्रवार (दि. २४) रोजी पर्यटनासाठी गोव्याला गेल्या होत्या. सोमवारी (दि. २७) रात्री सर्वजण कार (क्रमांक MH-12 VT-8213) मधून गोव्यातून पुण्याकडे परत येत होते. रात्रीच्या सुमारास गाडी शिपूर फाट्यानजीक पोहोचली असता पुढे जाणाऱ्या दुधाच्या टँकरने स्पीड ब्रेकरमुळे अचानक वेग कमी केला. त्यामुळे कारचालक अजय अशोक शेळके (वय २८) यांनीही कारचा वेग कमी केला.
मात्र, मागून येणाऱ्या तामिळनाडू राज्यातील एका कंटेनर चालकाने वेग न कमी करता कारला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण धडकेमुळे कार टँकर व कंटेनरच्या मध्ये अक्षरशः चिरडली गेली. अपघात इतका गंभीर होता की कारचा चक्काचूर झाला आणि अक्षता डहाळे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात कारमधील अजय अशोक शेळके (वय २८), सचिन देविदास सासवे (वय २५), स्नेहल अर्जुन खेतारी (वय १७), योगिता योगेश निंबाळे (वय ३५) व यश (वय ८, सर्व रा. पुणे) हे पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. संकेश्वर पोलिसांनी तामिळनाडू येथील कंटेनर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
अक्षता डहाळे या कोथरूड परिसरातील प्रसिद्ध ब्युटी पार्लर चालवत होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नुकत्याच गोव्यातून पर्यटन करून परतणाऱ्या अक्षता आणि त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शिपूर फाट्याजवळील हा भाग अपघातप्रवण असून या ठिकाणी अनेक वेळा अशा घटना घडल्या आहेत. महामार्गावरील स्पीड ब्रेकरचे अयोग्य नियोजन आणि वेगवान वाहनचालकांची निष्काळजी वृत्ती ही कारणे वारंवार अपघातांना आमंत्रण देतात, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.


