
माणदेश एक्सप्रेस/पुणे : सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपीने तरुणीशी गोड बोलून तिच्यावर स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आली. या प्रकरणी आरोपीची ओळख पटली असून त्याच्या शोधासाठी १३ पथके तैनात करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेतला असता तो कुठेही सापडला नसल्याने पोलिसांनी त्याला शोधून देणाऱ्याला तब्बल १ लाखांचं बक्षिस जाहीर केलं आहे.
पीडित तरुणी पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकात आली होती. तिला तिच्या गावी जायचं होतं. बसची वाट पाहत असातना तिला स्वारगेट एसटी स्थानकात तिला दत्तात्रय गाडे नावाचा व्यक्ती भेटला. गाडेने तिच्याशी गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला. तसंच, बस येथे लागत नसून पलीकडे लागत असल्याचं त्याने तिला एका रिकाम्या शिवशाही बसजवळ नेलं. या बसमध्ये आतमध्ये चढण्यास सांगून आरोपीही तिच्या मागून बसमध्ये गेला. तिथेच त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. हा प्रकार घडल्यानंतर भयभीत झालेली तरुणी पुन्हा आपल्या गावाच्या दिशेने निघालेली असताना तिने तिच्या मित्राला सर्व प्रकार सांगितला. तिच्या मित्राने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करायला सांगितल्यानंतर तिने स्वारगेट पोलिसांत पोलीस तक्रार केली. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला.
प्रकार उजेडात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि पीडित तरुणीने केलेल्या वर्णनानुसार आरोपीची ओळख पटवण्यात आली. यानुसार या आरोपीविरोधात आधीही अनेक गुन्हे दाखल असून तो सराईट गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याच्या शोधासाठी आता १३ पथके तैनात करण्यात आली असून श्वानपथकही कार्यरत करण्यात आलं आहे. तो कोणत्या ग्रामीण भागात लपून बसला असेल तर त्याला शोधून काढण्याकरता पोलिसांनी एक लाखांचं बक्षिसही जाहीर केलं आहे. याबाबत उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.
स्मार्तना पाटील म्हणाल्या, आरोपीला पकडून देण्याकरता १ लाखांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं असून आरोपीच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. त्याच्या भावाला चौकशीकरता ताब्यात घेण्यात आलं आहे.
दरम्यान, स्थानकावर अनेक सुविधांची कमतरता असून, काही सुविधांची भीषण दुरवस्था झाली असल्याचे आढळले. स्थानक परिसरात २४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर धूळ बसल्याचे दिसत असल्याने यातील चित्रीकरण सुस्पष्ट होते का, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे. ज्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला, तेथील खांबावर लावलेल्या एका कॅमेऱ्याचा रोख आकाशाकडे असल्याचे दिसून आले, तर एका कॅमेऱ्याचा रोख जमिनीकडे आहे. ही अवस्था पाहता, या कॅमेऱ्यांमध्ये नक्की कसे चित्रीकरण होत असेल, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.