
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मंचर :
पुणे-नाशिक महामार्गावर चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा गावाच्या हद्दीत असलेल्या ऋषी पेट्रोल पंपावर चार चोरट्यांनी पिस्तूलाचा धाक दाखवत दरोडा टाकला. या घटनेत तब्बल १ लाख ९० हजार ३७० रुपयांची रोख रक्कम लुटण्यात आली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी कर्मचारी घाबरू नयेत म्हणून हवेत गोळीबारही केला. ही थरारक घटना शुक्रवारी (दि. ३ ऑक्टोबर) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास दोन चोरटे दुचाकीवरून थेट पंपाच्या ऑफिसमध्ये घुसले. तर दोन जण बाहेर लक्ष ठेवण्यासाठी थांबले होते. आत गेलेल्या चोरट्यांनी कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखत धमकावले आणि बाहेरील कर्मचाऱ्यालाही आत खेचून आणले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना “हात वर करून उभे रहा, नाहीतर गोळी घालू” असा दम भरत पैसे द्यायची मागणी केली.
घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी काहीच प्रतिकार केला नाही. त्यातील एक चोरटा थेट टेबलाजवळ गेला आणि ड्रॉवर उचकून त्यातील रोकड हिसकावून घेतली. त्यावेळी सतत “पैसे द्या, नाहीतर जीवे मारू” असे म्हणत चोरटे दहशत माजवत होते. काही मिनिटांतच त्यांनी १ लाख ९० हजार ३७० रुपये हिसकावले आणि ऑफिसमधून बाहेर आले.
चोरी केल्यानंतर चौघेही चोरटे एकाच मोटरसायकलवर बसून पळ काढू लागले. मात्र, पेट्रोलपंपावरील कर्मचारी मागून पाठलाग करतील या भीतीने त्यातील एका चोरट्याने हातातील पिस्तूलातून हवेत गोळीबार केला. त्यामुळे कर्मचारी आणखी घाबरले आणि कोणीही त्यांचा पाठलाग करण्याचे धाडस केले नाही.
घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिसराची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क घातलेले असले तरी काही ठळक पुरावे पोलिसांना मिळाल्याची माहिती आहे. पोलिसांच्या विशेष पथकांकडून चोरट्यांचा शोध सुरु असून लवकरच ते गजाआड होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गावरील व्यापारी वर्ग आणि पेट्रोल पंप चालकांमध्ये विशेष चिंता पसरली आहे. रात्रीच्या वेळी दरोडेखोर एवढ्या सहजपणे पेट्रोल पंपावर हल्ला करू शकतात, हे पाहून नागरिकांमध्ये सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


