टीव्ही बंद करण्यावरून वाद – मुलाकडून बापाचा खून; दसऱ्याच्या दिवशी धक्कादायक घटना

0
455

माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे :

सणासुदीच्या दिवशी पुणे शहर हादरवणारी धक्कादायक घटना घडली आहे. दसऱ्याच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना कोथरुड परिसरातील जय भवानी नगर येथे बापलेकातील वादातून मुलाने वडिलांचा खून केल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे.

खून झालेल्या व्यक्तीचे नाव तानाजी पायगुडे असे असून, आरोपी मुलगा सचिन तानाजी पायगुडे (वय ३३) याला कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तानाजी पायगुडे यांच्या पत्नी सुमन तानाजी पायगुडे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायगुडे कुटुंब जय भवानी नगरमधील चाळ क्रमांक दोनमध्ये वास्तव्यास आहे. दसऱ्याच्या दिवशी, दुपारी साधारणपणे बारा वाजता सचिन हा माळ्यावर टीव्ही पाहत बसला होता. त्यावेळी वडील तानाजी यांनी त्याला — “टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक” असे सांगितले.

या छोट्याशा कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. पाहता पाहता वाद चिघळला आणि संतापाच्या भरात सचिनने स्वयंपाकघरातून चाकू आणला. त्याने वडिलांवर चाकूने हल्ला करून तोंडावर आणि गळ्यावर वार केले. या हल्ल्यात तानाजी गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.


सणाच्या दिवशी, घराघरात आनंदाचे वातावरण असताना घडलेल्या या घटनेमुळे जय भवानी नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिक हादरून गेले असून, “वडिलांचा जीव घ्यायला मुलाने एवढं कसं काय केलं?” असा सवाल स्थानिकांमध्ये केला जात आहे.


घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी मुलगा सचिन याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.

दरम्यान, कोथरूड पोलिस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.


एवढ्या क्षुल्लक कारणावरून मुलाने बापाचा जीव घेणे ही घटना समाजाला हादरवणारी आहे. दसऱ्यासारख्या मंगल दिनी घडलेली ही रक्तरंजित घटना केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी ठरली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here