उसने पैसे न दिल्याचा राग : वेटरकडून हॉटेल चालकाचा निर्घृण खून

0
134

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | पुणे :

उसन्या पैशाच्या किरकोळ कारणावरून पुण्यात एक धक्कादायक खून झाल्याची घटना समोर आली आहे. केवळ पैशांची मागणी भागवली नाही म्हणून वेटरने आपल्या हॉटेल चालकाच्या मानेत चाकू खुपसून त्याचा जागीच खून केला. ही थरारक घटना मंगळवारी (दि. २६) रात्री नऊच्या सुमारास कोंढवे धावडे परिसरातील पीकॉक फॅमिली गार्डन, बार अॅण्ड लॉजिंग येथे घडली.

खून झालेल्या हॉटेल चालकाचे नाव संतोष सुंदर शेट्टी (वय ४५) असे आहे. तर आरोपी वेटरचे नाव उमेश दिलीप गिरी (वय ३९, रा. कात्रज) असे असून, कोंढवे-धावडे पोलिसांनी त्याला घटनास्थळीच अटक केली आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी कोंढवे धावडे येथील पीकॉक हॉटेल भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतले होते. सुमारे २५ दिवसांपूर्वी उमेश गिरी हा त्यांच्याकडे वेटर म्हणून कामाला लागला. काम सुरू झाल्यापासून तो दर चार-पाच दिवसांनी शेट्टी यांच्याकडे उसन्या पैशांची मागणी करत असे. सुरुवातीला शेट्टी यांनी त्याला दोन वेळा पैसे दिले; मात्र नंतर वारंवार पैशांची मागणी केल्यामुळे त्यांनी उमेशला पैसे देण्यास नकार दिला.

यावरून दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ भांडण झाले होते. मंगळवारी रात्रीही उमेशने पुन्हा पैशांची मागणी केली. शेट्टी यांनी नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली. या वादानंतर उमेश शांतपणे किचनमध्ये गेला व तेथील चाकू हातात घेतला. काही क्षणांतच तो मागून शेट्टी यांच्या जवळ गेला आणि त्यांच्या मानेत जोरदार वार केला.


या अचानक हल्ल्याने संतोष शेट्टी क्षणात जमिनीवर कोसळले. त्यांच्या गळ्यातून प्रचंड रक्तस्राव होऊ लागला. हॉटेलमधील कर्मचारी व ग्राहकांनी तातडीने जखमी शेट्टी यांना माई मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.


धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतरही आरोपी उमेश गिरी हा घटनास्थळावरून पळून गेला नाही. तो शांतपणे तिथेच उभा राहिला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्याला तात्काळ अटक केली.


महत्वाची बाब म्हणजे उमेश गिरी याची संतोष शेट्टी यांच्याशी पूर्वी काही ओळख नव्हती. फक्त २५ दिवसांपूर्वीच शेट्टी यांनी त्याला कामावर घेतले होते. तरीदेखील अल्पावधीतच पैशांच्या वादातून एवढे टोकाचे पाऊल उचलण्यात आले.


या घटनेमुळे कोंढवे धावडे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून झालेला हा खून समाजमनाला हादरवून सोडणारा आहे. पोलिसांनी आरोपी उमेश गिरी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here